मुंबई : कल्याणपुढील लोकल प्रवास खडतरच! | पुढारी

मुंबई : कल्याणपुढील लोकल प्रवास खडतरच!

मुंबई; सुरेखा चोपडे :  कल्याण ते कसारादरम्यानचा तिसरा-चौथा रेल्वे मार्ग, 15 डबा गाड्यांचा विस्तार आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कल्याणपुढील लोकल प्रवास खडतरच असणार आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती पाहता त्यासाठी आणि काही वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत या भागातील प्रवाशांचा प्रवास हा चेंगराचेंगरीचाच राहणार आहे. रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले तर सामान्य मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखद होण्यास नक्कीच  मदत होईल.

कल्याण स्थानकातून कर्जत आणि कसारा असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेस, मालगाड्या धावतात.
गेल्या काही वर्षांत टिटवाळा, आसनगाव, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत भागात राहणार्‍या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ
झाल्याने लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कल्याण ते कसारादरम्यान दिवसभरात 152, तर कल्याण ते कर्जतदरम्यान 242 लोकल धावतात. कल्याण ते कर्जतदरम्यान दररोज सुमारे 7 ते 8 लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच कल्याण ते कर्जत या मार्गावरुनच पुणे आणि नाशिक शहरांकडे जाता येते. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे.

चौथा मार्ग रखडलेलाच !

कल्याण ते कसारादरम्यानच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेर्‍यांची संख्या वाढली नाही. त्यातच कल्याण
ते कसारादरम्यान दोनच रेल्वे मार्ग असल्याने त्यावरूनच लोकल व मेल, एक्स्प्रेस धावतात. मेल-एक्स्प्रेसची वाहतूक विस्कळीत झाल्यास लोकल रखडते. त्यामुळे मध्य रेल्वेने कल्याण ते कसारादरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला.

2016 मध्ये अर्थसंकल्पात तिसर्‍या मार्गिकेला मंजुरी मिळाली होती. परंतु गेल्या सहा वर्षांत या मार्गाकरिता आवश्यक 46. 34 हेक्टर जमिनीपैकी केवळ 12.04 हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या क्षमतेमध्ये भर टाकणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. 15 डबा लोकलचा विस्तार नाहीच ठाणे, कल्याणपुढील लोकल प्रवास सुकर करण्यासाठी 15 डबा लोकलचा विस्तार करण्याचे मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे स्वप्न धूसर झाले आहे. प्रवाशांचा वाढता भार वाहण्यासाठी सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याणपर्यंत 15 डबा जलद लोकल धावतात. या लोकलच्या दिवसभरात 22 फेर्‍या होतात. या लोकलगाड्या कल्याणपुढे नेण्यासाठी तिसरी व चौथी मार्गिका पूर्ण होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही स्वतंत्र मार्गिका मिळेल व लोकल फेर्‍यांची संख्याही वाढवता येईल. मात्र, मूळ प्रकल्पच रखडल्यामुळे लोकल विस्तारही अडकला आहे.

मेल-एक्स्प्रेसकरिता स्वतंत्र मार्गिका नसल्याने लेटमार्क कल्याण स्थानकात सात प्लॅटफॉर्म आहेत. येथून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. स्थानकातील चार, पाच, सहा आणि सात नंबर प्लॅटफॉर्मवरून लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. दिवसाला सुमारे 140 ते 150 गाड्या कल्याण स्थानकात थांबतात. मेल-एक्स्प्रेसकरिता स्वतंत्र मार्गिका नसल्याने लोकल आणि मेल-एक्स्प्रेस एकाच रुळावरून धावतात. त्यामुळे लोकलला लेटमार्क लागतो. यासाठी आता स्थानकात मेल-एक्स्प्रेसकरिता स्वतंत्र मार्गिका, प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) फेज 3 ए अंतर्गत 2018 साली मंजुरी मिळाली. या प्रकल्पाची किंमत सुमारे 81,297.56 लाख रुपये आहे. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात, अप गुड्स यार्डमधील 15 विद्यमान लाईन्स तोडण्यात येणार आहेत. तसेच सिग्नलिंग आणि रेल्वे इमारतींचे बांधकाम, ट्रॅक लिंकिंगसह पुलाचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे.

  •  दुसर्‍या टप्प्यात डाऊन गुड्स यार्डमधील 17 कार्यरत रेल्वे लाईन काढून तीन आयलँड प्लॅटफॉर्मसह एक कोचिंग कॉम्प्लेक्स, एक होम प्लॅटफॉर्म, पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार आहेत. पण हे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. तोपर्यंत कल्याणपुढील लोकल प्रवास खडतरच असणार आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर सामान्यांचा प्रवास आरामदायी होईल आणि मग ते एसी लोकलच्या नावाने बोटेही मोडणार नाहीत.

Back to top button