समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात ट्विटद्वारे त्यांना तुम्ही जे केले त्याचा परिणाम भोगावे लागेल, आता सगळे संपवून टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे. यानंतर त्यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली आहे.

कॉड्रीला ड्रग्ज कारवाईवरुन समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता. ही कारवाई बोगस असल्याचे सांगून आरोपींच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करुन नवाब मलिक यांनी त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर जातीवाचक टीकाटिपण्णी केली होती. ते अनुसूचित जातीतील नसून मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसेच दुबई आणि मालदिवला कुटुंबियांसोबत असताना त्यांनी काही बॉलीवूड कलाकारांकडून खंडणी वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची बदनामी झाली होती. या प्रकारानंतर त्यांनी दिल्लीतील अनुचित जाती-जमाती समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती. चौकशीनंतर या समितीने त्यांना क्लिनचीट दिली होती.

या क्लिनचीटनंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरुद्ध एका लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. त्यात त्यांनी दुबईत प्रवास केला नसताना नवाब मलिक यांनी आपल्यावर खोटे गंभीर आरोप केले होते. जातीविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या तक्रारीनंतर दुसर्‍या दिवशी समीर वानखेडे यांना एका अज्ञात ट्विटद्वारे धमकी देण्यात आली आहे. तुम्ही जे केले त्याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. आता सगळे संपवून टाकू, अशी धमकीवजा इशारा त्यांना मॅसेजद्वारे देण्यात आला आहे. या धमकीनंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. दरम्यान, वरिष्ठांनी या घटनेची गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button