आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य पथक उडदावणे महाराष्ट्रात प्रथम | पुढारी

आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य पथक उडदावणे महाराष्ट्रात प्रथम

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  आदिवासी रत्न ठकाबा गांगड यांच्या विचारांचा वारसा जोपासत आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य पथक उडदावणे (गांगडवाडी) यांनी नुकताच 9 ते 14 ऑगस्ट रोजी नागपूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि. प. सदस्या सुनीता भांगरे, प्रकल्पाधिकारी राजेंद्र भवारी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, सरपंच दिलीप भांगरे यांनी या पथकाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा सदस्य खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते झाले.

याच कार्यक्रमात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी उडदावणे गावच्या कलापथकाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य संस्कृती जोपासत अतिशय खडतर परिस्थितीमध्ये नागपूर गाठत अकोले तालुक्याचे नाव रोशन केले. याच कलापथकाचा पाया पूर्वजांपासून चालत आलेला आहे. या पथकात 36 जणांचा समावेश असून, पथक प्रमुख म्हणून सखाराम ठकाबाबा गांगड यांनी काम बघितले. नागपूर येथे याच पथकासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील रगतवान यांनी विशेष सहकार्य केले. या देदीप्यमान यशाबद्दल अकोले तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कांबड नृत्याने यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये आपली छाप टाकलेली आहे. अनेकांनी ही कला अवगत करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

आदिवासी कलाकारांना मानधन द्यावे
देशभर, राज्यभर विविध कार्यक्रम करीत आदिवासी संस्कृतीचे जतन करीत आहेत, परंतु शासन दरबारी अद्याप या कलाकारांची कोणीही दखल घेत नाही. या कलाकारांना विविध राज्यांमध्ये कार्यक्रमाला जात असताना विविध समस्या येतात. शासनाने आम्हा कलाकारांना कलाकार मानधन द्यावे, अशी मागणी पथक प्रमुख सखाराम ठकाबाबा गांगड यांनी केली.

1965 साली देशातही प्रथम क्रमांक..!
माजी आ. यशवंतराव भांगरे यांच्या सहकार्याने सन 1965 साली आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांच्या पथकाने दिल्लीचे तख्त राखत कांबड नृत्य प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सादर करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषिक घेऊन महाराष्ट्र राज्याची मान याच पथकाने उंचावली होती.

Back to top button