Rakesh Jhunjhunwala : तीन तासांत 20 कोटी कमवून झुनझुनवालांनी पत्नीसाठी खोलीत पहिल्यांदा AC लावला | पुढारी

Rakesh Jhunjhunwala : तीन तासांत 20 कोटी कमवून झुनझुनवालांनी पत्नीसाठी खोलीत पहिल्यांदा AC लावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे रविवारी 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांना 2-3 आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी आले होते. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी नुकतीच स्वतःची आकासा एअर ही एअरलाईन सुरू केली होती.

‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे शेअर बाजारातील मोठे नाव. पण त्यांचा प्रवास अगदी साध्या पद्धतीने सुरू झाला. त्याचे वडील आयकर अधिकारी होते आणि राकेश यांनी सीए व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. राकेश झुनझुनवाला यांनीही वडिलांच्या इच्छेनुसार सीएची तयारी केली आणि त्यात यश मिळवून त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘लग्नानंतर 2-3 वर्षे खूप मंदीत गेली. पण काही शेअर्सची खरेदी-विक्री करून मला 3 कोटी रुपये मिळवले. त्यावेळी केंद्रात व्हीपी सिंग यांचे सरकार होते. ते व्यापारी मानसिकतेचे होते. त्यातूनच त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या सरकारच्या काळात कराचे दर खूपच कमी होते. मी 1989 मध्ये त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात माझ्याकडची सगळी पुंजी शेअर बाजारात गुंतवली.

झुनझुनवाला पुढे म्हणाले की, ‘माझे तर लग्न झाले होते. माझी पत्नी श्रीमंत कुटुंबातील होती. तिच्याच्या माहेरी चारचाकी गाडी होती. घरातील सर्व खोल्यांमध्ये एसी होते. दुसरीकडे आमच्याकडे चारचाकी गाडी नव्हती आणि एसीचा असण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या पत्नीने मला आयुष्यात एकच मागणी केली तीही घरात एसी कधी लावणार? अशी. तिच्या या मागणीवर मी त्यावेळी फक्त सकारात्मक मान डोलावली. त्या काळात केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी सादर केला जात असे. त्यामुळे मार्केटही सायंकाळी 6-9 वाजेपर्यंत सुरू असायचा. त्यावेळी 6 वाजता माझी नेटवर्थ 3 कोटींची होती आणि रात्री 9 वाजता माझी नेटवर्थ 20 कोटी रुपयांपर्यंत गेली.’

पत्नीला दिली आनंदाची बातमी

ते पुढे म्हणाले की, ‘त्या दिवशी मी सर्व गोष्टींबाबत चर्चा करून रात्री 2 वाजता घरी पोहोचलो. त्यावेळी मी पत्नी रेखाला आनंदाची बातमी देत आपल्या घरात उद्याच एसी लावणार असल्याचे सांगितले. पत्नीही खुश झाली.’ वडिलांच्या शिकवणी बद्दल बोलतना झुनझुनवाला यांनी सागितले की, आमचे वडील म्हणायचे, कुणी पत्नीचे दागिने विकून तर कोणी इतर वस्तू विकून या शेअर बाजारात येतो. त्यामुळे कधीही चुकीचे काम करू नकोस. भारतात पैसा कमवणं इतकं सोपं असतं तर रस्त्यांवर भिकारी दिसले नसते. इतरांच्या सल्ल्यानुसार कधीही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू नकोस. त्यांनी दिलेला हा सज्जड दम मी आयुष्यभर लक्षात ठेवला आणि मी कधीच काही चुकीचे केले नाही.’

काही महिन्यांपूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांचा आणि पंतप्रधान मोदींचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये झुनझुनवाला यांना पीएम मोदी यांच्यासोबत तुमचे काय बोलणे झाले? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांनी ‘मधुचंद्राच्या रात्री मी माझ्या माझ्या पत्नीशी काय बोललो, ही काय सांगायची गोष्ट आहे का?’, असे खुमासदार उत्तर दिले. त्यानंतर त्या कार्यक्रमात एकच हशा पिकली.

Back to top button