रिक्षा, टॅक्सी चालकांच्या अरेरावीला लागणार लगाम;मोबाईल अ‍ॅपवर तक्रार करता येणार | पुढारी

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या अरेरावीला लागणार लगाम;मोबाईल अ‍ॅपवर तक्रार करता येणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी प्रवासी बस चालकांच्या अरेरावीला लगाम लागून तक्रारी झटपट निकालात काढण्यासाठी परिवहन विभागाने तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मोबाईल अ‍ॅपची सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये प्रवाशांना अरेरावी, मनमानी करणार्‍या चालकाचा आणि त्याच्या वाहनाच्या क्रमांकाचा फोटो पाठवायचा आहे. प्रवाशांच्या तक्रारींची आरटीओ कार्यालयाकडून त्वरीत दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे नाकारतात, जादा भाडे घेतात, जादा प्रवासी बसवतात, प्रवाशांशी वाद घालतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्रवासी आपल्या तक्रारी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर करतात. मात्र आऱटीकडे तशी सुविधा नसल्याने ई-मेलवर तक्रारी कराव्या लागतात. त्या तक्रारीचे योग्य पद्धतीने निराकरण होत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने मोबाईल अ‍ॅपची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मोबाईल अ‍ॅपची सुविधा 2017 मध्ये सेवेत होती. तांत्रिक कारणास्तव ही सेवा 2020 मध्ये बंद पडली. या अ‍ॅपचे काम महाआयटीकडे सोपविले आहे. सध्या अ‍ॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या असून त्या सोडवण्याचे काम सुरू आहे. महाआयटी तांत्रिक समस्या सोडवण्यात यशस्वी ठरल्यास महिनाभरातही हे अ‍ॅप सेवेत दाखल होईल. समस्या न सुटल्यास, नव्याने निविदा मागवून एखाद्या आयटी कंपनीची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येणार आहे. तसे झाल्यास आणखी तीन महिन्यात मोबाईल अ‍ॅप सेवेत दाखल होऊ शकेल.

कसे असेल मोबाईल अ‍ॅप?

मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार.
अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढण्याची व ते अपलोड करण्याची सुविधा असेल.
यामध्ये तक्रारींचे पर्याय असतील. ते प्रवाशांना निवडावे लागणार
तक्रार केल्यास त्याची माहिती संबंधित आरटीओला मिळेल. त्यानुसार तक्रारीची दखल घेतली जाईल
आरटीओने काय कारवाई केली याची माहिती प्रवाशांना मिळेल.

Back to top button