कायद्याच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला | पुढारी

कायद्याच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला

मुंबई : पवन होन्याळकर :  ज्या कुटुंबांतून पारंपरिक वकिली व्यवसाय चालत आला आहे, अशा घरांतील विद्यार्थ्यांचा कल वकिली शिक्षणाकडे अधिक पाहायला मिळत होता. पण आता कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर अन्य ठिकाणी हमखास जॉब मिळत असल्याने विधीच्या शिक्षणाची निवड अनेक जण करत असल्याचे दिसून येत आहे. एलएलबीच्या 3 वर्ष अभ्यासक्रमांच्या सुमारे 16 हजार जागांसाठी यंदा तब्बल 75 हजार अर्ज आले आहेत.

राज्यात 2016 मध्ये कायद्याचा अभ्यास हा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. याला महाविद्यालय तसेच संस्थास्तरावर मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. हा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून नोंद झाल्याने या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी लागू करण्यात आली. केवळ वकिली व्यवसाय म्हणून पाहत असलेल्या या अभ्यासक्रमाला रोजगार मिळवणारा अभ्यासक्रम असे वलय मिळाले आहे.

सरकारी कार्यालयाबरोबरच कायदेसल्लागार किंवा कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून खासगी कंपन्या, संस्था, कौटुंबिक वाद, कलह या क्षेत्रांतही वकिलांची गरज भासते. तर खासगी संस्थांत कायदेविषयक मार्गदर्शन तसेच स्वयंसेवी संस्थांना वकिली सेवेची गरज भासते. म्हणून हा कल अधिक वाढल्याचे विद्यार्थी सांगतात. शिवाय हमखास रोजगार मिळवून देत असल्याने या अभ्यासक्रमांना अधिक पसंती मिळत असल्याचे महाविद्यालयातील शिक्षकांचे म्हणणे आहे.

गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी अधिक लक्ष देऊ लागले आहेत. एलएलबी तीन वर्षे या अभ्यासक्रमांसाठी सुमारे 16 हजार जागा आहेत. या जागांसाठी प्रवेश पूर्वपरीक्षा देण्यासाठी 78 हजार 476 विद्यार्थ्यांनी नोंदणी सीईटी सेलकडे केली आहे, तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी सुमारे 8 हजार जागा आहेत. यासाठी 29 हजार 7 अर्ज आले आहेत.

लॉ शिक्षण पूर्ण करुन प्रत्यक्ष वकिली करण्याकडे कल कमी झालेला आहे. खरे तर न्यायालयात चांगल्या वकिलांची गरज आहे. नोकरी मिळवण्याचे माध्यम म्हणून या शिक्षणाकडे आता पाहिले जात आहे. आता लॉ शिकल्यास हमखास नोकरी उपलब्ध होत असल्याने अनेक जण लॉ शिक्षण घेत आहेत.
– असीम सरोदे, कायदेविषयक भाष्यकार

गतवर्षीचे प्रवेशाचे चित्र
एलएलबी 3 वर्ष
सीईटी पात्र ः 68,875
झालेले प्रवेश ः 17,333
एलएलबी 5 वर्ष
सीईटी पात्र ः 24,992
झालेले प्रवेश ः 8840

Back to top button