बंडखोरांविरुद्ध शिवसैनिक रस्त्यांवर ; जोरदार घोषणाबाजीसह बॅनर्स फाडले | पुढारी

बंडखोरांविरुद्ध शिवसैनिक रस्त्यांवर ; जोरदार घोषणाबाजीसह बॅनर्स फाडले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात जोरदार घोषणाबाजीसह बॅनर्स फाडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईतील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर दगडफेक झाली, तर आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर फाडण्यात आले.

कुर्ला विधानसभचे आमदार मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन मिळाल्याने शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कुडाळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचे बॅनरही फाडण्यात आले. आम्ही कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधातही शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चांदिवलीमध्ये माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर फाडले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
राज्यभरात शिवसैनिकांचा संताप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे बंडखोर शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

आक्रमक पवित्रा घेत तसेच घोषणाबाजी करत शिवसैनिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. गेले ते कावळे, उरले ते मावळे अशा घोषणा देत, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या मागे सदैव कायम राहणार, अशा प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिल्या. खबरदारीचा उपाय म्हणून क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नरेंद्र भोंडकर यांच्याविरोधात घोषणा
शिंदे गटात सामील झालेले भंडार्‍याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर यांच्याविरोधात शिवसैनिकांनी भंडारा शहरात निदर्शने केली. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

जळगावमध्ये पोस्टरबाजी
बंडखोर आमदारांविरोधात जळगावमध्येही पोस्टरबाजी पाहायला मिळत आहे. शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही, अशा आशयाचे फलक जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लावले आहेत. धरणगाव येथे देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला होता.

वर्ध्यात एकवटले शिवसैनिक
पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धा येथील ठाकरे मार्केट येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. आम्ही शिवसेनेसोबत, असे फलक शिवसैनिकांच्या
हातात दिसत होते.

मुंबईत बंदोबस्तात वाढ
संतप्त शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या बॅनरला काळे फासल्यानंतर आता मंगेश कुडाळकर याच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळे पोलिसांनी शहरातील शिवसेना शाखांसह जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शिवसेनेच्या विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यांना सतर्क केले आहे.

Back to top button