एकनाथ शिंदेंचे बंड : ‘मिशन लोटस’मुळे महाराष्ट्र बिगर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या दिशेने? | पुढारी

एकनाथ शिंदेंचे बंड : 'मिशन लोटस'मुळे महाराष्ट्र बिगर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या दिशेने?

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासून शिवसेनेतील बंडाने महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे धक्के सर्वदूर पोहोचले. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना बरोबर घेऊन गुजरात गाठले. यानंतर राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड भाजपच्या ऑपरेशन लोटसचा एक भाग आहे, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेते करत आहेत. भाजपने कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवणार अशी चर्चा सुरू झाली.

विरोधकांचा आरोप फेटाळत आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे तर महाराष्ट्रातील सरकार महाराष्ट्रातील सत्ता काबीज करणे यासाठी भाजपचे हे षड्यंत्र रचले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पाच राज्यात भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश

सत्ता स्थापण्यासाठी संख्याबळ कमी असतानाही ‘साम- दाम- भेदा’ च्या जोरावर भाजप सत्ता खेचते यालाच विरोधकांनी ऑपरेशन लोटस असे नाव दिले आहे. याच नावाखाली भाजपवर विविध आरोपही होत आले आहेत. यापूर्वी भाजपने पाच राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी हा प्रयोग केला आहे.

कर्नाटकमध्ये दोन वेळा प्रयोग यशस्वी

सर्वप्रथम 2008 मध्ये भाजपने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदारांच्या मदतीने सत्ता खेचून आणली यावेळी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांनी आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत यातील पाच आमदार विजयी ठरले. याच पाच आमदारांच्या जोरावर भाजपने कर्नाटक मध्ये स्थिर सरकार दिले. भाजपने राबवलेला हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. याच प्रयोगाची पुनरावृत्ती 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा कर्नाटकमध्येच केली धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसच्या १६ आमदारांनी राजीनामा दिला आणि एचडी कुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. सोळा आमदारांनी राजीनामा दिल्याने अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १०५ आमदारांनी मतदान केले आणि कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. या वेळी काँग्रेसने कर्नाटकात भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याचा आरोप केला. 26-7-2019 रोजी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 29-7-2019 ला त्यांनी विश्‍वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला. 2016 मध्ये उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी बंड केले आणि काँग्रेसचे सरकार बरखास्त झाले.

गोव्यातही काँग्रेस सत्तेपासून लांब

2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत 17 जागांवर काँग्रेसचा विजय झाला. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्तेवर दावा करत होता. मात्र यावेळी काँग्रेसचा मित्र पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीला आपल्या बाजूने वळविण्यात भाजप नेते यशस्वी झाले. गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार आले.

२०२० मध्यप्रदेश

मध्यप्रदेश मध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 109 तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या. काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र काही दिवसांमध्येच कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. यानंतर मध्यप्रदेशमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस राबवले असा आरोप काँग्रेसने केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बावीस आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये मध्यप्रदेश सरकारमधील 14 मंत्र्यांचा समावेश होता.

काँग्रेस विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते की, 15 महिन्याच्या काळात राज्य सरकारने तीन वेळा विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे गेले आहे. आता केवळ महाराजा (ज्योतिरादित्य सिंधिया) आणि बावीस संधीसाधू आमदारांनी सहन करणे हे मला असहाय्य झाले आहे. त्यामुळे मी सत्ता सोडत आहे. हा सर्व खेळ भाजपने सत्तेसाठी केला आहे, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली होती. यानंतर भाजपचे शिवराजसिंह चौहान पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

२०२० मध्ये राजस्थान

२०२० मध्ये राजस्थानमध्ये हा प्रयोग केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. मात्र यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली आणि राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार बचावले. आता महाराष्ट्रातही मध्यप्रदेश आणि राजस्थान प्रमाणे नाराज नेत्यांची मोट बांधत भाजप सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांचे बंड हा याचाच एक भाग आहे. यावर भाजप नेत्यांनी कोणते प्रत्युत्तर दिले नाही, मात्र भाजप मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा आणि अरुणाचल प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात यशस्वी होणार की राजस्थान प्रमाणे ऑपरेशन लोटस अपयशी ठरणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ऑपरेशन ऑपरेशन लोटसची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संख्याबळ कमी असतानाही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणत चमत्कार घडवला आहे. फडणवीस या चमत्काराची पुनरावृत्ती करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ऑपरेशन लोटस याचाच एक भाग मानला जात आहे. परिवर्तन होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे अप्रत्यक्ष संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लागले आहे.

हेही वाचा

Back to top button