

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या माध्यमाशी संवाद साधत असताना भावूक झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना होत आहेत असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
आम्ही छोटे शिवसैनिक तुम्हाला विनंती करतो आहोत की असा निर्णय घेऊ नका. ही सगळी गाजरं आहेत. भाजपच्या अमिषाला बळी पडू नका, असं आवाहन देखील पेडणेकर यांनी यावेळी केलं. आमचं घर फोडण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. हा मेलोड्रामा आत्मक्लेश देणारा आहे. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम करून दाखवलेलं आहे.
विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी काँग्रेस -शिवसेना-अपक्ष आमदार फोडले. सेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले खरे पण आमदार फुटल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदेंच्या बंडाने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला.
आम्ही शिवसेनेतच आहोत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडली. त्यामुळे ठाकरे सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असा निरोप शिंदे समर्थकांनी शिवसेना प्रमुखांना दिला. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण हे तापलेले दिसून येत आहे.
हेही वाचा