दहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर | पुढारी

दहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या मतदानासाठी अवघे 48 तास उरले असून राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आपापल्या आमदारांवर कडक पहारा ठेवला आहे. विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर असून या जागेची चावी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांची मते खेचण्यासाठी दोन्ही बाजूने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील अपक्षांच्या मतांसाठी त्यांच्या नेत्यांपुढे हात जोडले आहेत; तर या निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य ठरणार असल्याने आघाडीच्या नेत्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी सोमवारी मतदान होत असून सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांना पवई येथील हॉटेल वेस्टीनमध्ये मुक्कामी ठेवले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारपासून या हॉटेलमध्ये मुक्कामी असून शिवसेनेच्या आमदारांवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची करडी नजर आहे. शिवसेनेकडे 55 मते असून त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, इतकी मते त्यांच्याकडे आहेत. पण कोणताही धोका नको, म्हणून हॉटेलला शिवसैनिकांचा जागता पहारा आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीत धाकधूक

राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या छोटे पक्ष आणि अपक्षांच्या 12 मतांपैकी सहा मते ही शिवसेना पुरस्कृत अपक्ष आणि छोट्या पक्षांची आहेत. या आमदारांना खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. आता या आमदारांच्या मतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. रविवारी मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याबाबत कळवणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे; तर कोणताही धोका पत्करायचा नाही, असे शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे 26 मतांच्या कोट्यापेक्षा जास्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील. त्यामुळे शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदारांची मते अखेरच्या क्षणी शिवसेनेच्या उमेदवाराला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देतील, असाही शिवसेनेच्या रणनीतीचा भाग आहे.

शिवसेना पुरस्कृत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांपेक्षा समाजवादी पक्ष 2, एमआयएम 2, बहुजन विकास आघाडी 3 या मतांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची नजर आहे. या मतांसाठी या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. सपाच्या दोन मतांसाठी अखिलेश यादव यांच्याशी शरद पवार बोलले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी सपाचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्याशी चर्चा केली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मतांपैकी दोन मते राष्ट्रवादीला मिळतील, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

काँग्रेसची कोंडी

काँग्रेसकडे समर्थक एकही अपक्ष आमदार नाही. त्यामुळे त्यांची सर्वात मोठी कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या दुसर्‍या उमेदवाराला 10 मतांची गरज असून ही मते मिळविताना त्यांची दमछाक होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थक अपक्षांवर काँग्रेस विसंबून आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडील अपक्षांची मते मिळावीत, अशी विनंती जगताप यांनी पवार यांना केली. आपापल्या आमदारांची जबाबदारी घ्या, असे आघाडीत ठरले असल्याचे जगताप यावेळी म्हणाले. जगताप यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. समाजवादी पक्षाची तसेच काही अपक्ष आमदारांची मते काँग्रेसच्या दुसर्‍या उमेदवाराला मिळावीत, अशी विनंती केली. विधान परिदेच्या निवडणुकीबाबत अंतिम व्यूहरचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून रविवारी करण्याचे या बैठकीत ठरले आहे.

भाजपचे जोरदार प्रयत्न

भाजपकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. प्रसाद लाड यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गिरीश महाजन यांनीही शनिवारी विरार येथे जाऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत आपली मते मिळावीत, अशी विनंती त्यांनी ठाकूर यांना केली. पाचव्या उमेदवारासाठी मतांची बेगमी करणे भाजपला अवघड जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मिळालेली आघाडी समर्थक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची मते पुन्हा आघाडीकडे आणण्याचे प्रयत्न अजित पवार यांचे सुरू आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेली मते राखून आणखी 12 मते भाजपच्या पाचव्या उमेदवारासाठी खेचायची आहेत. त्यामुळे भाजपचे आघाडीच्या प्रमुख पक्षांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पसंतीच्या मतांचा सारिपाट…

अपुरे संख्याबळ असताना केवळ पसंतीच्या मतांच्या सारिपाटात भाजपने अचूक फासे टाकले. त्यामुळे ते जिंकले. त्यामुळे विधान परिषदेसाठी सगळेच पक्ष यावेळी पसंतीच्या मतांबाबत अभ्यास करून रणनीती आखत आहेत. विधान परिषदेच्या दहाव्या जागेचा निकाल हा पसंतीच्या मतांवर ठरेल. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या अशा पसंतीच्या मतांची बेरीज महत्त्वाची ठरणार आहे.

Back to top button