उद्या चमत्कार पाहाच; अजित पवारांचे आव्हान | पुढारी

उद्या चमत्कार पाहाच; अजित पवारांचे आव्हान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सोमवारी निवडणूक निकालानंतर चमत्कार पाहाच’, असे प्रतिआव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र डणवीस यांना दिले आहे. विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडेल, असे आव्हान फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले होते.

राष्ट्रवादी भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावाही उपमुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करत आहोत. शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणू शकतात, एवढी मते आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची न्यायालयाने परवानगी दिली नाही. त्यामुळे आमच्याकडे 51 आमदारांची संख्या आहे. एखादे मत राज्यसभेसारखे बाद ठरवले जाऊ शकते. त्यामुळे ती खबरदारी घेतली जात आहे. कोटा जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेने अपक्ष आमदारांना मंत्री केले आहे, ते शिवसेनेकडेच जातील. एक-दोन आकडे आमच्या उमेदवारांना घेतले तर तीन-चार मते कुणाला द्यायची हे ठरायचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट असून अपक्षांना आम्ही फोन केला होता. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली होती. ज्यांना फोन केला होता, त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करणार असल्याचे सांगितले आहे, असेही अजित पवार म्हणाले.

आमदार निवडून देत असताना आपापला कोटा आहे. परंतु आम्हाला संख्या कमी पडत असून त्याचे नियोजन सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना सर्वचजण जाऊन भेटले आहेत. त्यांना कोण भेटत असतील आणि मतदान करा, असे सांगत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. आता मतदानाला आमदारांची संख्या 284 राहिली तर 26 चा कोटा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवाराला मत मिळेल व विरोधकांनीही सद्सद्विवेकबुद्धीचे स्मरण करत आम्हालाच मत द्यावे, असेही अजित पवार म्हणाले.

ईडीची भीती?

1) काँग्रेसच्या आमदारांना ईडीची भीती दाखवली जात आहे. आमच्याकडे याबाबतचे रेकॉर्डिंग आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

2) यावर अजित पवार मात्र म्हणाले, केंद्रीय यंत्रणांकडून कॉल केले जात आहेत. याबद्दल आमच्या आमदारांनी आम्हाला अद्याप सांगितले नाही.

Back to top button