मुंबई पोलिसांचे घराचे स्‍वप्न अद्याप अपूर्णच ! | पुढारी

मुंबई पोलिसांचे घराचे स्‍वप्न अद्याप अपूर्णच !

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलातील पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. मुंबई पोलीस दलासाठी कर्तव्य बजावणार्‍या अनेकांना हक्‍काचे घर नसल्याने बृहन्मुंबई पोलीस को. ऑप. हौ. सोसायटीची तयार आली. या सोसायटीत सुमारे साडेसहा हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी लाखो रुपये भरले. मात्र 10 वर्षे लोटली, तरी अद्याप पोलिसांच्या हक्‍काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

मुंबई पोलीस दलात राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील पोलीस बांधव व भगिणी कार्यरत आहेत. या पोलिसांचे मुंबई शहरात हक्‍काचे घर नाही. त्यांना हक्‍काचे घर मिळण्यासाठी सन 2012 साली बृहन्मुंबई पोलीस को. ऑप. हौ. सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीत मुंबई पोलीस दलातील सुमारे साडेसहा हजार पोलीस अधिकारी, अंमलदारांनी पहिल्या टप्प्यात एक लाख 21 हजार रुपये भरले. या पैशांतून रायगड जिल्ह्यातील वायाळ गाव (पनवेल) येथे 120 एकर जमिनी विकत घेण्यात आली.

दरम्यान, 1 फेब्रुवारी 2020 रोजी सोसायटीकडून परिपत्रक क्र. 1 जारी करण्यात आले. त्यानुसार या सभासदांनी 1 लाख 80 हजार 500 रुपये जमा केले. अशा प्रकारे सर्व सभासदांनी एकूण 3 लाख 1 हजार 600 रुपये व त्याहून अधिक रक्कम सोसायटीत भरली. आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर व अन्य अधिकार्‍यांनी वेळोवेळी सर्व अटींची पूर्तता केली. इमारत उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र सध्या एमएसआरडीसी विभागाकडून एनओसी मिळत नसल्याने अद्याप बांधकामाच्या भूमिपूजनासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे अनेक अडचणी आल्याचेही बोलले जात आहे. मराठी असो वा विविध भाषिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांच्या न्याय्यहक्‍कांसाठी शिवसेनाची स्थापना केली. त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. त्यांनीच आता आमच्या घराच्या प्रश्‍नावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा बृहन्मुंबई पोलीस को. ऑप. हौ. सोसायटी तसेच हजारो पोलीस कुटुंबे व्यक्त करत आहेत.

Back to top button