पंडित शिवकुमार शर्मा : संतूरवादनातील जादू! | पुढारी

पंडित शिवकुमार शर्मा : संतूरवादनातील जादू!

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मूत झाला. त्यांचे वडील पं. उमादत्त शर्मा हेदेखील ख्यातनाम गायक होते. संगीत त्यांच्या रक्तातच भिनलेले होते. पाच वर्षांचे असताना पित्याकडूनच त्यांचे संगीत शिक्षण सुरू झाले. पं. उमादत्त यांनी त्यांना सूरसाधना आणि तबलावादन दोन्ही शिकविले. तेरा वर्षांचे असताना त्यांनी संतूर शिकायला सुरुवात केली.

वडिलांची इच्छा होती मुलाने जम्मू वा श्रीनगर आकाशवाणीत सरकारी नोकरी करावी; पण पंडितजींना ते मान्य नव्हते. एकुलती संतूर आणि खिशात 500 रुपयांसह ते मुंबईत आले. ते सांगत असत, ‘मला तेव्हा स्वत:चा खर्च भागविण्यासाठी तबला वाजवावा लागत असे. संतूर कुणीच स्वीकारत नसे.

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 1955 मध्ये पहिले संतूरवादन केले. मुंबईतील हा त्यांचा संतूरवादनाचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम अक्षरश: गाजला. संतूरच्या स्वरांमध्ये काय जादू असते, ते जगाला पहिल्यांदा यानिमित्ताने कळले. मुंबईनंतर मग पं. शिवकुमार व संतूर यांनी सर्वच सीमा ओलांडल्या. शास्त्रीय संगीतात त्यांना बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची साथ असे. या दोघांनी मिळून 1967 मध्ये जोडीने काम सुरू केले. ‘शिव-हरी’ या नावाने ही जोडी अल्पावधीत प्रसिद्ध झाली. दोघांची जुगलबंदी म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरे.

‘शिव-हरी’ जोडीची अवीट गोडी

संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया ही जोडी आपल्या शास्त्रीय संगीतातील जुगलबंदीसाठी प्रसिद्ध झालेलीच होती. 1967 मध्ये पहिल्यांदा दोघांनी ‘शिव-हरी’ नावाने एक क्लासिकल अल्बम तयार केला. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ असे या अल्बमचे नाव होते. अल्बम तुफान गाजला. नंतर दोघांच्या जुगलबंदीचे अनेक अल्बम आले.

चित्रपटांतील ‘सिलसिला’

नंतर चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा ‘शिव-हरी’ या जोडीला निर्माता दिग्दर्शक यश चोपडा यांनी ब्रेक दिला. 1981 मध्ये पडद्यावर झळकलेल्या अमिताभ बच्चन, संजीवकुमार, रेखा, जया भादुरी यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटात ‘शिव-हरी’ या जोडीचे संगीत होते. यश चोपडा यांच्याच 4 चित्रपटांसह दोघांनी मिळून एकूण 8 चित्रपटांना संगीत दिले. ‘चांदनी’, ‘डर’ या चित्रपटांतील गाणी प्रचंड गाजली. येत्या 15 मे रोजी त्यांची ‘कन्सर्ट’ नियोजित होती; पण बहुदा स्वर्गात देवतांना त्यांचे संतूरवादन ऐकायचे असेल.

‘शिव-हरी’ जोडीची ही काही गाजलेली गाणी

चांदनी ओ मेरी चांदनी
मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ हैं
रंग बरसे भिगे चुनरवाली
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये
जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन
तू मेरे सामने, मै तेरे सामने

Back to top button