मुंबईत पु्न्हा कोरोना अलर्ट | पुढारी

मुंबईत पु्न्हा कोरोना अलर्ट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली असे वाटत असतानाच गेल्या आठवड्यापासून त्यात वाढ होऊ लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. नागरिक घरी स्वत:च चाचण्या करण्यावर भर देऊ लागले आहेत. आठवडाभरात ही संख्या दुप्पट झाली आहे.

काही तज्ज्ञ जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत. एप्रिलपासून रुग्ण वाढू लागले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या साप्ताहिक कोविड अहवालानुसार, 13 ते 19 एप्रिल दरम्यान 390 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 20 ते 26 एप्रिल दरम्यान 549 नवीन रुग्ण आढळले आहेत.

1 ते 25 एप्रिल दरम्यान 3,322 लोकांनी होम टेस्टिंग किटद्वारे कोरोनाची चाचणी केली आहे, त्यापैकी केवळ एक टक्का म्हणजे 32 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मुंबईत दररोज सरासरी 10 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात असून, त्यापैकी 2 टक्के घरगुती टेस्टिंग किटद्वारे चाचणी केली जात आह, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईत 94 रुग्णांची नोंद

मुंबईत शनिवारी 94 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात 71 रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 609 इतकी आहे. 24 तासात 9 हजार 316 चाचण्या करण्यात आल्या. तर, दिवसभरात रुग्णालयामध्ये 6 रुग्णांना दाखल करावे लागले. तर एकाला ऑक्सिजनची आवश्यकता लागली. सिलबंद इमारती आणि कंटनमेंट झोनची संख्या शून्य असल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 8769 दिवसांवर पोहोचला आहे.

Back to top button