वाहतूक विभाग घेणार 20 हजार टँकरची झाडाझडती | पुढारी

वाहतूक विभाग घेणार 20 हजार टँकरची झाडाझडती

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : लोणावळा, औरंगाबाद आणि धुळे याठिकाणी सलग दोन आठवड्यात केमिकल व गॅस टँकर उलटल्याने झालेल्या अपघातांची वाहतूक प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील महामार्गांवरून ज्वलंत बॉम्बप्रमाणे फिरणार्‍या सुमारे 20 हजार केमिकल व गॅस वाहतूक करणार्‍या टँकरची 8 दिवसांत झाडाझडती घेण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना वरील माहिती दिली. लोणावळा येथे केमिकल टँकर उलटल्यानंतर पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक अंतर्गत मार्गाने वळवण्यात आली होती. हे केमिकल द्रव रुपामधून स्थायू रुपात परावर्तित झाल्यानंतर ते रस्त्यावरून हटवताना प्रशासनाचा तोंडाला फेस आला होता. याउलट मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे येथे टँकर अपघातात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली असती.

मात्र भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर टँकरमधील गळती रोखण्यात प्रशासनास यश आले होते. दरम्यान या दुर्घटनेत महामार्गावरील वाहतूक तब्बल 20 तासांसाठी वळवण्यात आली होती. वेळीच खबरदारी घेतली नसती, तर भीषण स्फोट झाला असता.

महामार्गावरून फिरणार्‍या टँकरमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या केमिकल किंवा गॅसची वाहतूक केली जात आहे?, अशा अपघातानंतर कोणत्या खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे?, या पदार्थांची हाताळणी कशी करायची? अशी माहिती पुढील आठ दिवसांत संकलित करणार असल्याचे कुलवंत कुमार सारंगल यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील 5 महामार्ग पोलीस अधीक्षकांना त्यांच्या अखत्यारित वाहतूक करणार्‍या टँकरची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये टँकरमध्ये कोणते केमिकल, गॅस किंवा ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होते? संबंधित वाहनाचा अपघात झाल्यास केमिकल किंवा गॅस हाताळणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? आवश्यक नियमांचे टँकर मालकांकडून पालन केले जाते का? अशा सर्व गोष्टींची पडताळणी या झाडाझडतीमध्ये घेतली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे नॅशनल सेफ्टी कौन्सिलकडून नियमावली तयार करताना विशेष मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

त्यादृष्टीने कौन्सिलसोबत वाहतूक प्रशासनाची प्राथमिक बैठकही नुकतीच पार पडली. परिणामी, सर्व माहिती संकलित झाल्यानंतर गॅस, केमिकल व इतर ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी नवी नियमावली वाहतूक प्रशासन तयार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ट्रेम’ कार्डची तपासणी करणार!

कोणत्याही केमिकल किंवा गॅसची वाहतूक करणार्‍या टँकर आणि माल वाहतूक वाहनांना ट्रान्सपोर्ट एमर्जन्सी कार्ड (ट्रेम) सोबत ठेवावे लागते. वाहन चालकाने हे कार्ड बाळगणे बंधनकारक असते. या कार्डमध्ये नेमक्या कोणत्या केमिकल किंवा गॅसची वाहतूक वाहनातून होत आहे, याची माहिती कळते. तसेच वाहनाचा अपघात झाल्यास संबंधित केमिकल किंवा गॅसवर नियंत्रण कसे मिळवायचे? याबाबतच्या उपाययोजना असतात. परिणामी, राज्यभरात केमिकल आणि गॅसची वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करून चालकांकडे संबंधित ट्रेम कार्ड आहे का? याची तपासणी वाहतूक विभागाकडून केली जाणार आहे.

टँकर्सकडून नियमांचे उल्लंघन

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून जाणार्‍या काही टँकर्सची स्वतः तपासणी केली. या तपासणीत त्यांना बहुतेक जुन्या टँकर्सवर वाहतूक होणार्‍या पदार्थाची माहिती स्पष्टपणे दिसत नसल्याचे निदर्शनास आले. याउलट काही वाहन चालकांना ’ट्रेम’ कार्ड बाबत कल्पना नव्हती. परिणामी, हा प्रकार गंभीर असून राज्यातील सर्व टँकर्सची झाडाझडती घेतानाच महामार्ग पोलिसांनाही ट्रेम कार्ड आणि यासंदर्भातील इतर महत्त्वाची माहिती देऊन प्रशिक्षित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button