गणेशमूर्तींच्या किमती तब्बल 40 टक्क्यांनी महागल्या | पुढारी

गणेशमूर्तींच्या किमती तब्बल 40 टक्क्यांनी महागल्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पेण, चिपळूण आणि महाडमध्ये आलेल्या महापुराचा फटका यंदाच्या गणेशोत्सवाला बसणार असून महापुरात मातीसह पीओपी मूर्तींचे नुकसान झाल्याने मुंबईत गणेशमूर्ती ची चणचण भासू लागली आहे. परिणामी मुंबईतील गणेशमूर्तींच्या किमती तब्बल 40 टक्क्यांनी महागल्या आहेत.

मुंबईतील मूर्तींच्या उंचीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या नाहीत. ज्या तयार होत्या त्या मूर्तींचे नुकसान झालेले आहे. पीओपीच्याही किमती वाढल्या आहेत. इंधनाचे दरही गगनाला भिडलेले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या कारणास्तव कारागीर मुंबईत काम कऱण्यास तयार नाही. त्यामुळे कारागिरांना अधिक मोबदला द्यावा लागत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती मधील किमती सरासरी 40 टक्क्यांनी महागल्या आहेत, असे सुप्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांनी पुढारीला सांगितले.

मूर्तिकार व मूर्ती विक्रेते तुषार मोजाड यांनी सांगितले की, पेणवरून मागवलेल्या मूर्ती काही प्रमाणात भिजलेल्या आहेत. या मूर्ती सुकवण्याचा आणि त्यांना टच अप कऱण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल. त्यातून मूर्तीचा खर्च वाढला. म्हणूनच मूर्तीच्या किमती 30 ते 50 टक्क्यांनी वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

मूर्तिकार मंगेश सारदळ म्हणाले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती साकारण्याचा खर्च वाढलेला आहे. गणेशभक्तांची आर्थिक परिस्थितीही लॉकडाऊनमुळे फारशी बरी नाही. त्यामुळे दरवर्षी मूर्ती घेणार्‍या ग्राहकांकडून यावर्षी अधिक पैसे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीची पावती पाहून यंदाही तितकेच पैसे आम्ही आकारणार आहोत.

Back to top button