शरद पवार म्हणाले, नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे करु नयेत | पुढारी

शरद पवार म्हणाले, नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे करु नयेत

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांना पूरग्रस्त भागांचा दौरा न करण्याचं आवाहन केले आहे. पूरस्थितीबाबतचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करेल. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील पूरस्थितीच्या आढाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांत जाऊन तिथल्या वस्तूस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. पण इतरांनी पूरग्रस्त भागांत जाऊ नये. यामुळे मदत कामावरुन लक्ष विचलित होईल. असे पवारांनी म्हटले आहे.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे घरांचे आणि अन्य प्रकारचे नुकसान झाले आहे. येथे आता मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुरामुळे सहा जिल्ह्यांत अधिक नुकसान आहे. राज्यांच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचेही नुकसान झाले आहे. माती वाहून गेली आहे.

पुरामुळे १६ हजार कुटुंबे उद्ध्वस्थ झाली आहेत. महाडमधील पाच हजार, चिपळूण, खेडमधील पाच हजार, कोल्हापूरमधील दोन हजार, सातारा येथील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

राष्ट्रवादीतर्फे पूरग्रस्त लोकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय पथकेही पूरग्रस्त भागांत पाठवली जाणार आहेत. असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सोमवारी सांगलीचा दौरा केला. तर आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागांत जाऊन ते लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत.

अजित पवार यांनी सांगली दौऱ्यात भिलवडी पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर निवारा केंद्राला भेट दिली होती.

हे ही वाचा :

Back to top button