कोल्हापूर : जनजीवन हळूहळू पूर्वपदावर | पुढारी

कोल्हापूर : जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर अभूतपूर्व महापूर आपत्तीनंतर चार दिवसांनी सोमवारी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यावयास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत गेल्या 24 तासांत चार फुटांहून अधिक घट झाली आहे. ही पाणी पातळी 47 फुटांखाली गेल्याने महापुराचा विळखा सैल होत चालला आहे.

बालिंगा पाणी उपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरून सुरू असून, उद्या, मंगळवारपासून कोल्हापूर शहरातील काही भागातील पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सोमवारी दिवसभरात 11 हजारांहून अधिक कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरल्याने महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये महापुराच्या आपत्तीत 243 कोटी रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज सरकारी यंत्रणेने व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असल्याने कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला असून, कोल्हापूर शहराला असलेला पुराचा वेढाही सोमवारी दुपारी शिथिल झाला. जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला खुला झाला आहे. राधानगरी धरणाचा 5 नंबरचा केवळ एकच स्वयंचलित दरवाजा सुरू असून, त्यातून प्रतिसेकंदास 2,828 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

स्वच्छता मोहिमेला वेग

पंचगंगा नदीची पातळी सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 47.5 फूट इतकी होती. 24 तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी 4 फुटांनी उतरली. पूर ओसरल्याने शहरातील अनेक भागांत स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. बालिंगा उपसा केंद्रातील पंप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज सुरू होण्याची शक्यता आहे.

शिरोळ भागातील पूरस्थिती ‘जैसे थे’

शिरोळमधील पूरस्थिती अद्याप गंभीरच आहे. लष्कराच्या पथकाकडून शिरोळ, कुरूंदवाड, खिद्रापूर या भागातील नागरिकांचे स्थलांतर युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिक तसेच जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले आहे. अलमट्टी धरणातून प्रतिसेकंदास 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणातून 33 हजार 266 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिरोळमधील पुराची पाणी पातळी स्थिर असल्याने शिरोळकरांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.

चिखलीतील पूर ओसरतोय

कोल्हापूर शहरालगत असणार्‍या आंबेवाडी व चिखली भागातील पुराचे पाणी ओसरत चालले आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी चिखली गावातील पाणी पातळी चार फुटांवर होती. त्यामुळे काही नागरिक पाण्यातून वाट काढत घरातील संसारोपयोगी साहित्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. जिल्हा प्रशासनाने धोका पत्करून कोणीही पुराच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.40 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. सोमवारी दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1,400 व सिंचन विमोचकातून 1,428 असा एकूण 2,828 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 खुला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी-94.47 द.ल.घ.मी., वारणा-886.24 द.ल.घ.मी., दूधगंगा-590.77 द.ल.घ.मी., कासारी-63.51 द.ल.घ.मी., कडवी-71.24 द.ल.घ.मी., कुंभी-68.60 द.ल.घ.मी., पाटगाव-94.93 द.ल.घ.मी., चिकोत्रा-40.04 द.ल.घ.मी., चित्री-53.41 द.ल.घ.मी. (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी-32.40 द.ल.घ.मी., घटप्रभा-44.17 द.ल.घ.मी., जांबरे-23.23 द.ल.घ.मी., आंबेओहोळ-30.98 द.ल.घ.मी. बंधार्‍यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे-राजाराम 47.5 फूट, सुर्वे 45.3 फूट, रूई 77.2 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 74.1 फूट, शिरोळ 74.11 फूट, तर नृसिंहवाडी बंधार्‍याची 74.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.

राष्ट्रीय महामार्ग सुरू

गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद होता. पाणी पातळी कमी झाल्याने सोमवारी दुपारी हा मार्ग सुरू करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर वाहतूक करणारे टँकर प्रथम शहरात सोडण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी टप्प्याटप्प्याने वाहने सोडणार असल्याचे सांगितले. प्रथम अवजड वाहने, नंतर रात्री उशिरा चारचाकी वाहनांना सोडण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील 23 जिल्हा मार्ग व 19 ग्रामीण मार्ग पाण्याखाली गेले आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत असणारे 36 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

22 गर्भवती महिलांची प्रसूती

पूरबाधित भागात 330 गर्भवती महिलांचे ‘एनडीआरएफ’ व स्थानिक बचाव पथकातील तरुणांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. यातील 22 महिलांची यशस्वीरीत्या प्रसूती करण्यात आली. या महिलांवर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार सुरू आहेत.

243 कोटींची हानी

कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ महापुराचा वेढा आहे. या काळात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरबाधित क्षेत्रातील घरे, संसारोपयोगी साहित्य, शेती, महावितरण, नळपाणी योजना, रस्ते, पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 243 कोटी 35 लाख 2 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अजूनही शहर व तालुक्यांतील काही भाग बाधित आहेत, त्यामुळे नुकसानीची ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Back to top button