पुणे सहकार कार्यालय : सहकारच्या नियमित बदल्यांसाठी अधिकार्‍यांची ‘फिल्डिंग’ | पुढारी

पुणे सहकार कार्यालय : सहकारच्या नियमित बदल्यांसाठी अधिकार्‍यांची ‘फिल्डिंग’

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुणे सहकार कार्यालय द्वारे अधिकारी-कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्यांना आता वेग येण्याची अपेक्षा असून 31 जुलैपुर्वी हे सोपस्कर पार पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी अनेकांनी मंत्रालय स्तरापर्यंत ‘फिल्डिंग’लावलेली आहे. पुणे सहकार विभाग कार्यालय हे बर्‍याचशा अधिकार्‍यांची पहिली पसंती आहे. त्यामुळे पुण्यात कायम तळ ठोकलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आव्हान सहकार विभागापुढे आहे.

सहकार मंत्री, राज्यमंत्री आणि सहकार सचिवपदी कोणाचीही वर्णी लागू, आम्ही सहकारचे पुणे मुख्यालय सोडणार नाही, असा चंगच सहकार आयुक्तालयातील काही अधिकार्‍यांनी बांधलेला आहे.

तसेच कायम त्याच कार्यालयात सेवा बजावण्यामुळे अथवा काही दिवस इतरत्र जाऊन पुन्हा आयुक्तालयातच तळ ठोकणार्‍या अधिकार्‍यांना क्षेत्रिय स्तरावर बदली करण्यास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि नवनियुक्त सहकार सचिव अनुप कुमार प्राधान्य देणार का? याकडे सहकार वुर्तळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

तसेच फिरुन फिरुन सहकार आयुक्तालय आणि पुण्यात तळ ठोकणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आव्हानही त्यांच्यासमोर उभे राहिल्याची चर्चाही रंगलेली आहे.

राज्यात विभागीय स्तरावर अथवा जिल्हा स्तरापर्यंत जाण्याची तयारी कायमच पुण्यात असलेल्या अधिकार्‍यांमध्ये नसल्याची चर्चा विभागात रंगलेली आहे.

सहकार सचिव पदाची धुरा अनुप कुमार यांच्याकडे

सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली झालेली आहे.

त्यांच्या जागी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांची सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पुन्हा बदली झालेली आहे.

अनुप कुमार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्याचे सहकार आयुक्तालयातून सांगण्यात आले.

ज्युनियर मुख्यालयात, सिनियर्स बाहेर…

सहकार आयुक्तालयातील आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या साखर आयुक्तालय आणि पणन विभागात प्रति नियुक्तीने बदल्या होतात. हे होत असताना अनेकदा विभागातील ज्युनियर अधिकार्‍यांकडे सहकार आयुक्तालयातील वरिष्ठ स्तरावरील पदभार कायम देण्यात येत आहे.

तर सिनियर्स अधिकार्‍यांकडे साखर व पणन विभागातील पदभार देऊन कामकाज चालविले जात आहे.

त्या अधिकार्‍यांना पुन्हा मुख्य प्रवाहात म्हणजे सहकार आयुक्तालयात आणण्याचे कसब सहकार मंत्री दाखविणार का? हे पाहणेही उत्सुकतेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही पाहा : 

Back to top button