महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन | पुढारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप (वय ५४) यांचे निधन झाले आहे. माणिकराव जगताप यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जगताप यांच्या निधनानं महाराष्ट्र काँग्रेस पक्षानं दु:ख व्यक्त केले आहे. ‘जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

जगताप यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा कोकणातील चेहरा हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. ते एक उत्तम संघटक होते, कुशल वक्ते होते.

लोकांच्या प्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. कोकणच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. माणिकराव जगताप माझे निकटचे सहकारी होते. त्यांच्या रूपात माझा एक बंधुतुल्य मित्र निघून गेला, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी जगताप यांच्या निधनावर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

ते २०१४ च्या निवडणुकीत महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

हे ही वाचा :

Back to top button