पुणे- बंगळूर महामार्ग चौथ्या दिवशी वाहतुकीसाठी खुला | पुढारी

पुणे- बंगळूर महामार्ग चौथ्या दिवशी वाहतुकीसाठी खुला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे- बंगळूर महामार्ग अखेर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता वाहतुकीस खुला झाला आहे. पुणे- बंगळूर महामार्ग खुला झाल्याने अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. महापुराने पुणे बंगळूर महामार्ग व्यापून टाकला होता. शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट तर काही ठिकाणी दहा फुटांवर पाण्याची पातळी होती.

त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आला होता. तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज सकाळी पाणी झपाट्याने ओसरले.

सकाळी साडेनऊ वाजता जेसीबीद्वारे चाचणी घेण्यात आली. त्यानंतर दहा वाजता महामार्गावरील वाहतूक खुली करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण भोसले तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी प्रवासासाठी घाई करू नये…

गॅस टँकर, ऑईल टँकर, रुग्णवाहिका, दूध टँकर, अवजड वाहने प्राधान्याने सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवासासाठी घाई करू नये, असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे.

गेल्या शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर प्रथमतः पुणेकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू केली होती. तर काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. गेली चार दिवस या महामार्गावरून वाहतूक बंद होती. आज सकाळी ही वाहतूक सुरु झाली. यामुळे महामार्गावर अडकून पडलेली वाहने मार्गस्थ होत आहेत.

दरम्यान, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगूर फाट्यानजीक आलेले पुराचे पाणी ओसरले आहे.  यामुळे पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे पूर ओसरत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

Back to top button