मुंबई : सरकारी शुल्कात खासगी वैद्यकीय शिक्षण! | पुढारी

मुंबई : सरकारी शुल्कात खासगी वैद्यकीय शिक्षण!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आता सरकारी शुल्कात वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य होणार आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयामधील 50 टक्के जागांवरील शुल्क हे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्काएवढे असावे असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी संस्था वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी 10 ते 25 लाखांपर्यंतचे शुल्क आकारले जाते. यामुळे अनेकदा सरकारी महाविद्यालयात काही गुणांमुळे प्रवेश नाकारला गेला आणि आर्थिक स्थिती नाही म्हणून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहतात. तर अनेक विद्यार्थी हे बीडीएस, आयुर्वेद, युनानीसारखे पर्याय निवडतात.

अशावेळी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने आयोगाने खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 50 टक्के जागांवर सरकारी वैद्यकीय शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे समजते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला कायद्याने देशातील खाजगी वैद्यकीय कॉलेजांमधील 50 टक्के जागांचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार दिला आहे.

काय होणार?

आर्थिक परिस्थिती नाही म्हणून खाजगी कॉलेजांमध्ये प्रवेश न घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनाही हे शिक्षण सुलभ होणार आहे.
याला विरोध होत, न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते अशी शक्यताही आहे.

सरकार शुल्क रक्कम देणार असल्याने 50 टक्के जागांसाठीच्या शुल्कात वाढ होण्याची भीती आहे, संस्था आणखी उखळ पांढरे करून घेतील अशी भीती आहे.

Back to top button