सीईटी परीक्षा : ‘छप्पर फाड के’ गुण असले तरी सीईटीवरच भवितव्य | पुढारी

सीईटी परीक्षा : ‘छप्पर फाड के’ गुण असले तरी सीईटीवरच भवितव्य

मुंबई ; पवन होन्याळकर : मूल्यमापनाच्या आधारावर लागलेल्या दहावीच्या निकालात छप्पर फाड के गुण मिळाल्यामुळे अकरावी प्रवेश टफ फाईट होतील का, अशी चर्चा असली तर अकरावी प्रवेशासाठी होणार्‍या सीईटी परीक्षा वरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

आयसीएसई आणि सीबीएसई या केंद्रीय बोर्डांच्या विद्यार्थ्यांना 90 टक्केहून अधिक गुण दरवर्षी मिळतात. त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशात केंद्रीय विद्यार्थी आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी 90 प्लस संघर्ष पाहायला मिळतो. दहावीच्या टक्केवारीवरच विद्यार्थ्यांची नामवंत महाविद्यालये काबीज करण्याची धडपड असते. यंदा मात्र कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे.

दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या आणि मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर झाला. केवळ सातशे मुले राज्यात नापास झाली, तर तब्बल 99 टक्केहून अधिक सर्वच मंडळाचे निकाल लागले आहेत. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 90 टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 4 हजार 633 इतकी आहे. 85 ते 90 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 1 लाख 28 हजार 174 इतके आहेत. पैकीच्या पैकी गुणांची थेट खैरात झाल्याने प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार आहे.

सीईटी परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांना गुण मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर सीईटी असल्याने राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना फारशी अडचण येणार नाही. सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई या केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना अकरावीचे राज्य मंडळाचे महाविद्यालय निवडताना अभ्यास करावा लागणार आहे.

सीईटी ऐच्छिक असली तरी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवर प्रवेश परीक्षा न देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

मुंबईचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. या विभागात 1 लाख 10 हजार 979 विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, तर एक लाख 59 हजार 811 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत.

सीईटीचे गुण कटऑफ?

गतवर्षी मुंबईत अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत 90 प्लस विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसून आले होते. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील नामांकित महाविद्यालयांतील पहिल्या कटऑफने 95 टक्क्यांचा आकडा पार केला होता.

85 च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसर्‍या यादीशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. यंदा तर सीईटी परीक्षा गुण हे अकरावी प्रवेशाचे कटऑफ असणार आहे.

प्रवेश लांबणार

अकरावी प्रवेशाला असलेली सीईटी नोंदणीचे संकेतस्थळ दोन दिवसात बंद झाले. विद्यार्थ्यांना ही नोंदणी 26 जुलैपर्यंत करण्याची मुदत आहे. मात्र संकेतस्थळ सुरू नसल्याने अडचणी आहेत.

तर ही परीक्षा 21 ऑगस्टमध्ये ऑफलाईन होणार आहे. त्यानंतर निकाल आणि प्रवेश प्रक्रिया यामुळे सप्टेंबर प्रवेशात जाईल आणि अकरावीचे वर्ग ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Back to top button