तानसा, मोडकसागर ओव्हरफ्लो; चिंता मिटली | पुढारी

तानसा, मोडकसागर ओव्हरफ्लो; चिंता मिटली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे तानसा व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले. या दोन तलावातून मुंबईला सुमारे 900 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या तलावासह अन्य तलावातील पाणीसाठा 53.86 टक्क्यांवर पोहचल्यामुळे मुंबईकरांवर असलेले पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे नॅशनल पार्कमधील तुळशी व विहार तलाव गेल्या आठवड्यातच ओसंडून वाहू लागले. पण शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील तलाव कधी भरणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते.

मोडक सागर तलावअखेर गेल्या दोन दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तानसा गुरुवार 22 जुलै पहाटे 5.48 वाजता व मोडक सागर गुरुवारी रात्री 3.24 वाजता ओसंडून वाहू लागले. शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणार्‍या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

भातसा तलावातील पाणीसाठा 3 लाख 68 हजार दशलक्ष लिटरवर पोहचला आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व सात तलावातील पाणीसाठा 7,79,568 दशलक्ष लिटर झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरण्यासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अजून 6 लाख 70 हजार द.ल. लिटर पाण्याची आवश्यकता आहे. महापालिकेचा मध्य वैतरणा तलावही 47 टक्के भरला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील अपर वैतरणा तलावांमध्ये अवघा 4.3 टक्के पाणीसाठा आहे.

गेले काही दिवस पावसाने जोर धरला असला तरी जून महिन्यांत दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. या काळात मोठ्याप्रमाणात पाणीकपात करावी लागते की काय, अशीही शक्यता निर्माण झाली होती.

आता जोरदार बरसात होत असली तरी पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यास पाण्याची आवश्यकता निश्‍चितच निर्माण होईल. दरम्यान, पावसाचा जोर आणखी एक-दोन दिवस कायम राहिला तर पाण्याची उरलीसुरली गजरही मिटण्याची शक्यता आहे.

Back to top button