बारावीचे निकाल हँग, जुलै अखेरपर्यंत निकाल लागण्याची सुतराम शक्यता नाही | पुढारी

बारावीचे निकाल हँग, जुलै अखेरपर्यंत निकाल लागण्याची सुतराम शक्यता नाही

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मूल्यांकन भरता भरता सतत हँगणारी संगणक प्रणाली, मूल्यांकन करणार्‍या शिक्षकांनी वाढवून मागितलेली मुदत अशा कोंडीत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सापडले असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 31 जुलैच्या मुदतीत बारावीचे निकाल लागण्याची सूतराम शक्यता नाही.

मात्र मूल्यांकन अपलोड करण्याची मुदत वाढवून देण्यास मंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. शिक्षक विरुद्ध मंडळ आणि हँग होणारी मंडळाची वेबसाईट अशा तिहेरी संघर्षात बारावीचा निकाल तूर्तास हँग झाल्याचे चित्र आहे.

अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काय करायचे असा यक्षप्रश्‍न मंडळासमोर आहे. जुलै अखेरपर्यंत निकाल लावा, असे न्यायालयाने बजावलेले आहे. या मुदतीत निकाल न लावल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो.

दुसरीकडे ऑनलाईन निकालाची प्रणाली साथ देत नाही. ती संथगतीने सुरू आहे. मुंबईत बारावीचे जवळपास तीन लाख विद्यार्थी असून त्यापैकी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्याचे गुण अद्याप भरावयाचे बाकी आहे. एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत.

राज्यातील सुमारे तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख विद्यार्थ्यांचे गुण भरावयाचे बाकी आहेत. पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचे अंतिम पडताळणी करण्याचे काम अपूर्ण आहे. 23 जुलै गुण अंतिम भरण्याची तारीख दिली आहे.

एका विद्यार्थ्याचे मूल्यांकन संगणकावर टाकण्यास किमान 15 ते 20 मिनिटे लागत आहेत. एकूण विद्यार्थी संख्या पाहता ही डेडलाईन पाळता येईल, अशी स्थितीच नाही. आणखी तीन दिवस म्हणजे 26 जुलैपर्यंत मुदत मिळावी, असे शिक्षक म्हणतात. ही मुदत वाढवून दिल्यास निकालही लांबणार दहावीप्रमाणे बारावीचीही परीक्षा यंदा कोरोनाने रद्द केली.

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यासाठी शिक्षकांना 23 जुलैपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र दोन दिवसापासून राज्य मंडळाचे संकेतस्थळ चालत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येत आहेत. संकेतस्थळाचा मंद वेग पाहता गुण अपलोड करण्यासाठी 26 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

गेले चार दिवस महामुंबई परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, वाहतुकीची अपुरी साधने अशा अडचणी पार करून निकालाचे काम करण्यासाठी बारावीचे शिक्षक बुधवारी सुट्टी असताना शाळा-महाविद्यालयांत पोहचले परंतु सर्व्हर डाऊन होता. काम न करता त्यांना बसून रहावे लागले.

मंगळवारीही मुंबईतील अनेक महाविद्यालयात शिक्षक रात्रभर थांबले पण सर्व्हर डाऊन झाल्याने गुण अपलोड करता आले नाहीत. शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळाकडे तक्रारी केल्यानंतर संगणक प्रणाली सुरू झाली असली तरी ती धीम्या गतीने सुरू आहे.

1. गुण भरण्यासाठी संगणक प्रणाली राज्य मंडळाने विकसित केली आहे. ही यंत्रणा धीम्या गतीने चालू असून एका विद्यार्थ्यास नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ जात आहे. 15 मिनिटे लागत आहेत. गुण सेव्ह न होणे, मध्येच संकेतस्थळ बंद होणे अशा तक्रारी आहेत.

2. बारावीच्या शिक्षकांना दहावीच्या शिक्षकांच्या तुलनेत कमी दिवस दिले आहेत. बारावीच्या शिक्षकांना दहावी, अकरावी व बारावी असे तीन इयत्तांचे गुण भरावयाचे आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुण भरताना शिक्षकांना प्रचंड अडचणी येत आहेत.

3. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच अकरावीच्या प्रवेशासाठीसुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करावे लागत असल्याने संगणक प्रणालीवर प्रचंड ताण पडला आहे. स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्याची गरज होती. मात्र बारावी निकाल आणि अकरावी प्रवेश असा दुहेरी ताण एकाच प्रणालीवर टाकण्यात आला आहे.

Back to top button