MHADA Exam : म्हाडा सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षेची तारीख ठरली | पुढारी

MHADA Exam : म्हाडा सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षेची तारीख ठरली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली म्हाडाच्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांची ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन परीक्षा होणार आहे. (Mhada Exam)

३१ जानेवारी,१,२,३,७,८ व ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निवडण्यात आली आहेत तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.

ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या संकेतस्थळावर २२ जानेवारीपासून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून, या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे,अशी माहिती सागर यांनी दिली.

Mhada Exam : विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी परिक्षा

म्हाडा सरळ सेवा भरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक-प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे व अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.

Back to top button