भिवंडी अपघात : कोळशासह ट्रॉली झोपडीवर उलटली; तीन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा जागीच अंत | पुढारी

भिवंडी अपघात : कोळशासह ट्रॉली झोपडीवर उलटली; तीन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा जागीच अंत

भिवंडी ; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात विटभट्टीसाठी लागणारा दगडी कोळसा हायड्रॉलीक हायवा ट्रकमधून खाली केला जात होता. दरम्यान ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण मागील ट्रॉली कोळश्यासह वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर पडली. यामुळे झालेल्या अपघातात आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्या मुलींचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दुर्दैवी मृत्यू झाला. (Bhiwandi Accident)

या दुर्घटनेत बाळाराम कान्हा वळवी या आदिवासी वीटभट्टी मजुराच्या लावण्या (वय ७), अमिषा (वय ६), प्रीती (वय २) या तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने इतर कामगार त्याठिकाणी धावून येत कोळशाच्या ढिगाऱ्याखालुन सर्वांना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत या चिमुरडींचा जीव गेला होता. भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील मोहिली येथील बाळाराम वळवी हा आपल्या पत्नी चार मुलींसह वीटभट्टी मजुरीसाठी टेंभिवली येथे वीटभट्टीवर मजुरीसाठी आले होते.

Bhiwandi Accident : कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉलीमधील कोळश्यासह ट्रॉली कोसळली

विटभट्टी परिसरतीलच गवताच्या झोपडीत हे मजूर कुटुंब वास्तव्यास होते. त्याच्या झोपडी लगतच्या मोकळ्या जागेत विटभट्टी पेटविण्यास आवश्यक असणारा दगडी कोळसा साठविला जात होता.

कोळसा घेऊन आलेला ट्रक रिकामा करण्यासाठी मागची बाजू वर करत असताना कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉलीमधील कोळश्यासह ट्रॉली कोसळली. व त्यामधील कोळसा बाळाराम वळवी यांच्या झोपडीवर पडला, दरम्यान झोपडीत असलेल्या तिघी मुलींवर हा कोळसा आणि मागचा भाग पडल्याने त्या गाडल्या गेल्या. सुदैव म्हणजे शौचालयास गेलेले बाळाराम, झोपडी बाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली कीर्ती (वय २) हे बचावले आहेत.

या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादीवरून वीटभट्टी मालक गोपीनाथ मढवी, मुलगा महेंद्र मढवी व्यवस्थापक सुरेश रामदास पाटील,ट्रक चालक तौफिक शेख यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

तपास अधिकारी पो उपनिरीक्षक दाभाडे यांनी गोपीनाथ मढवी व व्यवस्थापक सुरेश पाटील यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली. दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करीत आपला संताप व्यक्त केला आहे.

Back to top button