

मुंबई; पुढारी ऑनलाईन
नगरविकास विभागाच्या अधिकार्याच्या खुर्चीवर बसून कागदपत्रे तपासणे आणि मंत्रिमंडळाची गोपनीय टिपणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना कशी दिली गेली, याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी जनमाहिती तथा कार्यासन अधिकारी पु. म. शिंदे यांनी सोमय्या यांना नोटीस बाजावून खुलासा मागितला आहे.
यानंतर आज किरीट सोमय्या यांनी खुलासा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे मंत्रालय कुणाच्या बापाची मालकी नाही असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्यावर गुन्हा दाखल कधी करताय याची वाट पाहतोय असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. होय मी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीच फाईल तपासायला गेलो होतो असेही त्यांनी म्हटले आहे.
नगरविकास विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे ती कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस दिली ते स्पष्ट करा अशी विचारणा करत त्यांनी नोटीस पाठवून दादागिरी सुरु असल्याचा आरोप केला. माझ्यावरचा राग मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर राग कशासाठी ? असेही ते म्हणाले.
फोटो अपलोड केलेल्यांना नोटीस का पाठवली नाही ? हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरे मंत्रालय कुणाच्या बापाची मालकी नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मंत्रालयात नगरविकास विभागाच्या अधिकार्याच्या खुर्चीवर बसून फायली तपासत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील बांधकाम प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत दंड व व्याजमाफी देण्यात आली होती. या विषयाची गोपनीय टिपणीही सोमय्या यांना देण्यात आली. त्यावर या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमवारी केली.
सोमय्या मंत्रालयात नगरविकास विभागाच्या अधिकार्याच्या खुर्चीवर बसून फायली तपासत होते. तर त्यांनी माहितीच्या अधिकारात तशी परवानगी घेतली होती का? आणि परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर सरकारी कार्यालयात घुसून सरकारी फायलीची चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.