आता सुट्टीच्या दिवशीही काढा पक्के लायसन्स, सुविधा उपलब्ध | पुढारी

आता सुट्टीच्या दिवशीही काढा पक्के लायसन्स, सुविधा उपलब्ध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई सेंट्रल आरटीओने शनिवार व रविवारीही आरटीओमध्ये पक्के लायसन्स काढण्यासाठी स्लॉट उपलब्ध करून दिले असून, सुट्टीच्या दिवशीही पक्के लायसन्स काढण्याची सुविधा नवख्या चालकांना मिळणार आहे.

परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा उपलब्ध केल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) पक्के अर्थात परमनंट लायसन्ससाठी स्लॉट बुक होत नसल्याची अडचण निर्माण झाली होती.

परिवहन विभागाने चालकांना घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सुविधा सुरु केली. या उपक्रमाला राज्यभरातून उत्तम प्रतिसादही मिळाला. मात्र लर्निंग लायसन्स काढणार्‍यांची संख्या प्रचंड वाढल्याने त्यावरील आरटीओंचे नियंत्रण सुटले. परिणामी, लर्निंग लायसन्स काढल्यानंतर तातडीने चालक परमनंट लायसन्स काढण्यासाठी स्लॉट बुक करू लागले.

मर्यादित कर्मचारी आणि जागा असल्याने आरटीओकडून पुढील महिनाभरासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे स्लॉट दररोज अवघ्या काही मिनिटांतच हाऊसफुल्ल होत असल्याच्या तक्रारी नवख्या चालकांकडून सुरू होत्या. त्यावर तोडगा म्हणून मुंबई सेंट्रल आरटीओने आठवड्यातील पाच दिवस सुरु असलेल्या सेवेचा कालावधी वाढवला. तरीही प्रश्न जैसे थे असल्याने अखेर शनिवार व रविवारीही आरटीओ सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई सेंट्रल आरटीओंनी घेतला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर म्हणाले की, नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारीही पक्के लायसन्ससाठीची चाचणी घेतली जाणार आहे. 29 आणि 30 जानेवारी या दोन दिवशी स्थानिक सुट्टीदिवशी चालकांना ही सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे शनिवार व रविवारी चालकांना चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Back to top button