परभणी: गंगाखेड तालुक्यात ३० हजार गोरगरिबांपर्यंत पोहोचला ‘आनंदाचा शिधा’ | पुढारी

परभणी: गंगाखेड तालुक्यात ३० हजार गोरगरिबांपर्यंत पोहोचला 'आनंदाचा शिधा'

प्रमोद साळवे

‘गौरी- गणपती’ उत्सवानिमित्त शासनाने राज्यातील गोरगरिबांना अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. यानुसार तालुक्यातील १६३ रेशन दुकानांतून एकुण ३६ हजार ६५८ लाभार्थ्यांपैकी सुमारे ३० हजार गोरगरिबांपर्यंत हा शिधा पोहचला आहे. यामुळे ऐन सणासुदीतच्या काळात येथील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

दिवसेंदिवश महागाई  वाढतच आहे. यातून राज्यातील गोरगरिब जनतेला आपले सण- उत्सव उत्साहात साजरे करता यावेत. या उद्देशाने गतवर्षीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे संकल्पनेतून १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ गोरगरिबांना उपलब्ध करून दिला आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला (१४ एप्रिल) प्रारंभ झालेल्या या योजनेची अंमलबजावणी ‘गौरी-गणपती’ उत्सवातही विना अडथळा सुरू आहे.

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व शेतकरी कार्ड लाभधारकांस रवा, चणाडाळ, खाद्यतेल व साखर या वस्तूंचा समावेश असलेला शिधा वाटप करण्यात येतो. गंगाखेड तालुक्यातील १६३ रेशन दुकानांतून या शिधेचे वाटप युद्धपातळीवर सुरू आहे. उपविभागीय अधिकारी युवराज डापकर, तहसीलदार प्रदीप शेलार, नायब तहसीलदार (पुरवठा) अशोक केंद्रे यांचेसह स्वस्त धान्य दुकानदार संघटना व महसूल प्रशासन अंतिम लाभार्थ्यांपर्यंत शिधा वाटपासाठी प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील एकूण ३६ हजार ६५८ लाभार्थ्यांपैकी आजरोजीपर्यंत सुमारे ३० हजार लाभार्थ्यांना या सरकारच्या योजनेचा लाभ पोहोचला आहे. येत्या एक-दोन दिवसांच्या अवधीतच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ‘आनंदाचा शिधा’ पोहोचेल अशी अपेक्षा आहे, असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिधावाटप अंतिम टप्प्यात – अशोक केंद्रे, नायब तहसीलदार (पुरवठा)
‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यासाठी शहरासह तालुक्यातील गावोगावी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून शिधा वाटपाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. एकही पात्र आनंदाच्या शिदेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

 

Back to top button