हिंगोली : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन | पुढारी

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपविले. ही घटना रविवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी ही अकरावी घटना आहे.

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील संतोष झाबुराव वाघमारे ( वय ४२) हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मागील काही दिवसापासून तो अस्वस्थ होता.

दरम्यान, रविवारी सकाळी त्याची मुले शिकवणी वर्गासाठी गेली होती. पत्नी बाहेर असताना संतोष याने औषध घेतले. काही वेळानंतर त्याची पत्नी घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर संतोष यास उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संतोष याचा मृत्यू झाल्याची जाहीर केले.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजू जाधव, पंढरी चव्हाण, पोलीस पाटील स्वप्निल गांजरे यांच्या पथकाने भेट दिली. मयत संतोष याच्या खिशामध्ये चिट्ठी सापडली आहे. दरम्यान, मृत संतोष यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button