छत्रपती संभाजीनगर : दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'ग्रोप्ड'ची निवड

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : येथील प्रथमेश सांजेकर याचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ‘ग्रोप्ड’ (Groped) या लघुपटाची निवड २०२४ च्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. जगातील ६० पेक्षा जास्त देशांमधून जवळपास १० हजार लघुपट या फेस्टिव्हलमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी पहिल्या १०० मध्ये ग्रोप्डची निवड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकर याने पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गंत महाविद्यालयातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे.  आपण बनवलेल्या कलाकृतीतुन महिलांविषयीचा एक सामाजिक संदेश देता यावा, यासाठी मेहनत घेत प्रथमेशने ‘ग्रोप्ड’ लघुपटाची निर्मिती केली. त्याच्या या लघुपटाला २०२४ च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (DPIFF) लघुचित्रपट श्रेणीत १० हजार फिल्मधून पहिल्या १०० मध्ये नामांकन मिळाले आहे.  ‘ग्रोप्ड’ या लघुपटाला यापुर्वी पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शनसाठी प्रथमेश याला पुरस्कार देखील मिळालेला आहे. या लघुपटासाठी डीओपी म्हणून देवांश भट्ट याने काम पाहिले आहे. यामध्ये मराठी कलाकार विकास हांडे, अश्विनी बागल आमि मंगेश पवार यांनी अभिनय केला आहे.

काय आहे ग्रोप्ड (Groped)?

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर आलेला असतो. रेल्वे, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात त्यासंदर्भात काही महिला विरोध करून आवाज उठवतात. मात्र, काही महिला भीती किंवा इतर काही कारणांमुळे गैर वर्तनाला विरोध करू शकत नाहीत. त्यांच्या मनातील भावना काय असतात, या विषयावर ग्रोप्ड लघुपटाची निर्मिती करण्यात आल्याचे प्रथमेशने सांगितले.

हेही वाचा :

Back to top button