धक्कादायक : सहा महिन्यांच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले | पुढारी

धक्कादायक : सहा महिन्यांच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : समाजात आजही मुलींना नाकारण्यात येत असलेल्या घटना घडत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना एका नकुशीबरोबर घडली आहे. सहा महिन्याच्या या चिमुकलीला सोमवारी (दि.८) रात्री चक्क एका पिशवीत बांधून एका निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परळी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांच्या तत्परतेने या मुलीचा जीव वाचला आहे.

परळी वैजनाथ येथून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर सहा महिन्याच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोमवारी (दि.८) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मालेवाडी गावाच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये लाल बेडशीटमध्ये गुंडाळलेले जिवंत मूल असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना फोनवरून मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस कर्मचारी सुनील अन्नमवार हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केले असता सहा ते आठ महिन्यापूर्वी जन्मलेली मुलगी त्यामध्ये आढळून आली. या चिमुकलीला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चिमुकलीस अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button