नांदेडच्या फायनान्स कंपनीवरील छाप्यात सापडले 170 कोटींचे घबाड

नांदेडच्या फायनान्स कंपनीवरील छाप्यात सापडले 170 कोटींचे घबाड
Published on
Updated on

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आयकर विभागाने शिवाजीनगर येथील फायनान्स कंपनीसह त्यांच्या अन्य प्रतिष्ठानांवर छापे टाकून झाडाझडती घेतली होती. तीन दिवस चाललेल्या तपासणीमध्ये तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 170 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. 14 कोटी रुपये रोख आणि आठ कोटी रुपये किमतीच्या 12 किलो सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. आचारसंहिता काळात ही देशात झालेली सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा केला जात आहे.

शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रा.लि.ची दोन कार्यालये, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था आणि संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, परभणी, नांदेड येथील पथकाने एकाचवेळी ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर अन्य फायनान्स कंपन्यांसह जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली होती.

तब्बल 25 वाहनांतून 60 पेक्षा अधिक अधिकार्‍यांनी सूर्योदयापूर्वीच संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली. भंडारी फायनान्स व अन्य व्यवहारांसंदर्भात पुरावे हाती लागल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली. भंडारी यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा असून, तो नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात पसरलेला आहे. या व्यवहारासाठीच त्यांनी खासगी फायनान्स कंपनी स्थापन केली असून, नातेवाईकांच्या नावावर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, या व्यवहारात मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करत आयकर चुकविल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. दागिन्यांमध्ये 24 कॅरेट सोन्याची 50 पेक्षा अधिक बिस्किटे तसेच हिरे आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे. तसेच भंडारी यांच्या वेगवेगळ्या सात प्रतिष्ठानांमध्ये कागदपत्रे, सीडी, हार्डडिस्क व पेनड्राईव्हमध्ये ही बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news