परभणी: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा | पुढारी

परभणी: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: एकेकाळी शिवणकाम टेलरिंगच्या व्यवसायाकडे युवकांचा कल होता. तो आता बोटावर मोजता येईल इतपत कमी झाला आहे. नव्हे तर ‘हा’ व्यवसाय करण्यासाठी युवा पिढी दूर जात असल्याचे दिसून येत आहे. रेडिमेड, ऑनलाइन कपडे घरपोच सेवा, शिवणकाम दरवाढ अशा अनेक कारणांमुळे शिवणकाम करणारा टेलरिंगचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

ग्रामीण ते शहरी भागात एकेकाळी नावाजलेले शिवणकाम करणारे टेलर्स म्हणून चर्चेत गणले जात होते. त्या चर्चा आता कालबाह्य होत आहेत. जुन्यापिढीतील टेलर्स पडद्याआड गेले आहेत. १० वर्षांपूर्वी युवा पिढीतील टेलर्स निर्माण झाले. गावात शिवणकाम करणाऱ्या जुन्या पिढीतील टेलरच्या हाताखाली विनामोबदला शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण घेतले जात असे. काच बटन लावण्याच्या सुरुवातीपासून, तर कापड कापण्यापर्यंत असे हे प्रशिक्षण होते. नंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर युवा पिढीतील तरुणांनी स्वतःचे दुकान थाटले. ही पिढी आता प्रशिक्षण घेणारी अखेरची पिढी असल्याची दिसून येत आहे. सुरुवातीला भरभराटीला आलेला हा व्यवसाय ऑनलाइन व रेडिमेड कापड आल्याने अडचणीत आले आहे.

महिलांना मशीन तर पुरुष टेलर्सना का नाही ?

गावात शिवणकाम करून उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लागावा, यासाठी महिलांना शिलाई मशीन दिल्या जात आहेत. परंतु, प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या मात्र पुरुष टेलर्सना असे कोणतेही व्यावसायिक लाभ शासनाकडून दिले जात नाहीत. पुरुष टेलर्सनाही शिलाई मशीन देणारी योजना राबविल्यास व्यवसायाला मदतीची ठरणार आहे, हे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने विचारात घेतले पाहिजे, असा सूर आहे.

Back to top button