वेध लोकसभेचे – दोन प्राचार्यांचा पराभव | पुढारी

वेध लोकसभेचे - दोन प्राचार्यांचा पराभव

उमेश काळे

अलिकडच्या काळात प्राचार्य, प्राध्यापक यांनी निवडणुका लढविणे हे काही नवीन नाही. पण जेव्हा प्राचार्य हे केवळ ज्ञानदानाचे काम करीत किंवा प्राचार्यां बद्दल समाजात आदराची भावना होती, तेव्हा लोकसभा निवडणुकीला उभे राहून संसदेत पोहोचण्याचा प्रयत्न मराठवाड्यातील दोन ज्येष्ठ प्राचार्यांनी केला होता, त्यात एक होते प्राचार्य गो. रा. म्हैसेकर आणि दुसरे प्राचार्य रामदास डांगे.

१९७७ च्या निवडणुकीत म्हैसेकर यांना नांदेडमधून काँग्रेसने उमेदवारी दिली. तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी म्हैसेकरांसाठी आग्रह धरल्याने त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत शेकापचे नेते केशवराव धोंडगे यांच्याकडून १ लाख ३३ हजार ८२० मतांनी म्हैसेकर पराभूत झाले. धोंडगे यांना २५३,७३६ तर म्हैसेकर यांना ११९,९१६ मते मिळाली. कालांतराने म्हैसेकर यांना राज्यसभेवर घेण्यात आले. नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांचे प्राचार्य म्हैसेकर हे वडील होत.

संत साहित्याचे अभ्यासक

संत साहित्याचे अभ्यासक म्हणून राज्यभरात सुपरिचित असणारे प्राचार्य रामदास डांगे यांनी परभणी लोकसभेत आपले भविष्य आजमाविण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीचे वर्ष होते १९८०. काँग्रेसचे रामराव लोणीकर, शेकापचे शेषराव देशमुख, अपक्ष रामदास डांगे यांच्यासह १० उमेदवार रिंगणात होते. इंदिरा गांधी यांच्या झंझावतात कोणाचा निभाव लागला नाही. डांगे अपक्ष असले तरी त्यांच्यासाठी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. डांगे हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी २९,८०९ मते मिळाली. लोणीकर यांना १७३,१०५ तर देशमुखांना ७४,१५५ मते पडली होती. डांगे हे तसे मूळ विदर्भातील. पण मराठवाड्याच्या मातीशी ते समरास झाले.

सुप्रसिद्ध साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा छत्रपती संभाजीनगरात नोकरीत असताना त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. तेव्हा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी डांगे यांचे गुण हेरून त्यांना देवगिरी महाविद्यालयात रूजू करून घेतले. १५ जून, १९६१ रोजी ते रूजू झाले आणि दोन वर्षात त्यांना प्रोफेसरपदी बढतीही मिळाली. १५ दिवसांतच त्यांना परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्यपद देऊ केले गेले.

शिवाजी महाविद्यालय (परभणी), संत जनाबाई महाविद्यालय (गंगाखेड), (कै.) कमलताई जामकर महिला महाविद्यालय (परभणी) येथे तब्बल ३३ वर्षे प्राचार्यपदी राहिले. गंगाखेडला त्यांनी सुरू केलेली शारदा व्याख्यानमाला मराठवाड्यात प्रसिद्ध झाली होती. परभणीत कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केलेल्या चळवळीत १९७२ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत झाले होते. त्यावेळी स्थापन झालेल्या जनता पक्षाचे काम परभणीत वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मूलपाठ दीपिका ज्ञानदेवी हा ज्ञानेश्वरीचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यासाठी ७० पेक्षा जास्त हस्तलिखिते मिळवून त्यांनी अभ्यास केला. शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

प्राचार्य वाघमारे राज्यसभेवर

मराठवाड्यात दरारा असणार्‍या प्राचार्यांपैकी देवगिरीचे प्राचार्य सखाराम बागल हे विधानसभेला उभे होते. लातूरचे प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे हे शरद पवारांचे निकटवर्ती. लातूर नगरपालिकेत थेट जनतेमधून ते निवडून आलेले नगराध्यक्ष. त्यांना पवारांनी राज्यसभेवर पाठविले होते. संभाजीनगरचे प्राचार्य एस. टी. प्रधान यांनी रिपाइंच्या तिकिटावर १९७७ मध्ये लोकसभा लढविली होती. नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानसभेचीही उमेदवारी मिळाली होती. पण ते विजयी झाले नाहीत.

 

Back to top button