केशरकाकू : मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार | पुढारी

केशरकाकू : मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार

उमेश काळे

मराठवाड्यातून पहिल्या महिला खासदार म्हणून लोकसभेत काम करण्याचा मान हा बीडच्या केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे जातो. बीड जिल्ह्यातील राजुरीच्या सरपंच, पंचायत समिती सभापती, चौसाळ्याचे आमदार आणि १९८० च्या निवडणुकीत खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास. १९८० नंतर तीन टर्म बीडचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले.

खरे म्हणजे काकूंचे माहेर विजापूर, पण त्यांचा विवाह जुळला तो राजुरीच्या सोनाजीराव क्षीरसागरांसोबत. दिवसभर घाण्यावरून तेल काढून विक्री करण्याचा व्यवसाय करणार्‍या केशरकाकूंचे विचार क्रांतिकारी स्वरूपाचे होते. रझाकारांच्या दडपशाहीने होरपळून निघालेल्या या भागात हिंदूं महिलांनाही पडदा पद्धत लागू होती, ती काकूंनी प्रथम मोडीत काढली. त्यांचा हा गुण सरपंचपदापर्यंत घेवून गेला. त्यांचे पती सोनाजीराव यांचा गावात दबदबा होता. ते सांगतील तसे गाव ऐकत असे. साहजिकच काकूंचे नेतृत्व हे आणखी विकसित झाले.

पं. नेहरू, विनोबांचे आशीर्वाद

बालपणी विजापूर येथे असताना महात्मा गांधी यांची फेरी घरासमोरून जात असताना लहानग्यी केशरने त्यांच्यासमोर जयजयकार केला. पंडितजीची मिरवणूक जात असताना त्यांचे लक्ष मिरवणूक पाहत उभ्या असलेल्या केशरकडे गेल्यानंतर त्यांनी बोलावून गुलाबाचे फूल दिले. सामाजिक कार्याच्या प्रेरणेस हे दोन प्रसंग पूरक ठरल्याचे काकू सांगतात. पुढे भूदानासाठी विनोबा गावात आले असता काकूंनी महिलांना एकत्र केले. त्यावेळी विनोबांनी तुम्ही आणखी पुढे जा असा सल्ला दिला. हा सल्‍ला मानून काकू काँग्रेस राजकारणात सक्रीय झाल्या. शाळा, कारखान्यांची उभारणी केली. १९८० मध्ये मातब्बर उमेदवार स्पर्धेत असताना वसंतदादा पाटील यांच्यामार्फत इंदिराजींची भेट घेतली आणि उमेदवारी खेचून आणली. या निवडणुकीत त्या ६७ हजार ५०३ मतांनी, १९८४ ला १ लाख १० हजार आणि ९१ ला १९८६ हजारांवर मतांनी प्रतिस्पर्धांना पराभूत केले.

बिंदुसरेची ओटी भरली

१९८९ मध्ये बीडसह महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांता पुराचा तडाखा बसला. रात्री केव्हातरी पावसाला प्रारंभ झाला आणि जोर एवढा होता की, सकाळी उठल्यावर बिंदुसरा नदीने बीड वेढले होते. तीशनेवर लोक वाहून गेली. पूल, झोपड्या, घरे, झाडे उन्मूळन पडली. लोक मदतीसाठी आक्रोश करीत होते. काकू परिवरासह मदतकार्यात उतरल्या, पण त्या पुन्हा घरी गेल्या. घरातून खणाची ओटी घेतली आणि बिंदुसरेला प्रार्थना केली. काही वेळांनी पूर ओसरू लागला. पंचायत समिती सदस्य असताना मतदानासाठी दोन दिवसाची ओली बाळंतीण असतानाही पुरातून पोहत मतदानासाठी बीडला पोहचल्या. आमदार असताना रोहयो कमिटीचे त्या सदस्य होत्या.

महाबळेश्‍वरच्या मजुरांनी पैसे मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्या थेट महाबळेश्‍वर येथे पोहोचल्या. वासोट्याच्या जंगलात त्यांनी मजुरांचे म्हणणे ऐकले व परतणार तोच आकाशात काळे ढग जमा झाले. लाँचमध्ये बसून तातडीने पैलतीर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मुसळधार पावसाने गाठले, जंगल परिसरातील पहिलाच पाऊस, संध्याकाळची वेळ, लाँच कशीबशी पलिकडे पोहोचली. पण केशरकाकूंची तळमळ, धाडसाने प्रशासकीय यंत्रणाही थक्‍क झाली.

इंदिराजींनी पेन्सिल आपटली

१९८४ पूर्वी पंतप्रधान आणि अन्य नेत्यांना भेटणे फारसे अवघड नव्हते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अन्य नेत्यांशी केशरकाकूंची जवळीक होती. केशरकाकूंच्या झालेल्या एका सभेला व्यासपीठावर इंदिराजी, केशरकाकू आणि प्रेमलाताई चव्हाण तिन्ही महिलाच होत्या. एकदा साखर कारखाना उभारणीला परवानगी मिळावी म्हणून केशरकाकू इंदिराजींकडे गेल्या होत्या. तेव्हा इंदिराजी घाईगडबडीत होत्या, त्यांनी टेबलावर पेन्सिल आपटली आणि त्या काकूंना म्हणाल्या, जल्दी बोलो मुझे बाहर जाना है. काकू म्हणाल्या, ‘आपने पेन्सिल टेबलपर पटक दी, मैं डर गई हूं. मैं अभी नहीं कह सकती. मुझे हिंदीभी आती नहीं.’. नंतर त्या जेव्हा इंदिराजींना भेटल्या तेव्हा त्यांची कारखाना काढण्याची मानसिकता पाहून इंदिराजीही चकित झाल्या. महिला नेत्या साखर कारखाना कसा काय काढू शकतात, असा प्रश्‍न इंदिराजींसमोर होता, पण काकूंनी त्यांच्या मनातील शंका दूर केली.

दुसर्‍या भेटीत बीड दूरदर्शन केंद्र त्यांनी मंजूर करून आणले. केशरकाकू या तेली समाजाच्या. त्यांनी बीड जिल्ह्यात स्वकर्तृत्वाने आपली पकड घट्ट केली. जिल्ह्याच्या राजकारणावर क्षीरसागर घराण्याचा ठसा कायम आहे. केशरकाकूंनंतर रजनी पाटील, प्रीतम मुंडे या दोन महिला खासदारांनी बीडचे प्रतिनिधीत्व केले.

आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना होण्याची चिन्हे आहेत. प्रीतम यांच्या दोन टर्म झाल्या. या निवडणुकीतही बीडच्या खासदार महिलाच होण्याची शक्यता आहे. एवढे मात्र खरे की, जिल्ह्यात महिला राजकारणाची पायाभरणी केशरकाकूंनी पडत्या काळात घातली.

Back to top button