वेध लोकसभेचे-शेकापचे तीन शिलेदार… | पुढारी

वेध लोकसभेचे-शेकापचे तीन शिलेदार...

उमेश काळे

परभणी, धाराशिव हे दोन जिल्हे आणि नांदेडच्या काही भागात शेतकरी कामगार पक्षाचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे जनता पक्षाची निर्मिती झाल्यानंतर शेकापशी संबंधित तीन खासदार या जिल्ह्यांमधून निवडून गेले. त्यात परभणीतून शेषराव देशमुख यांना मतदारांनी पसंती दिली. देशमुख हे शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते. परभणीत एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या देशमुखांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार अशी पदे त्यांनी आपल्या हयातीत भूषविली. 1974 साली जनतेमधून नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक झाली, त्यात देशमुख हे निवडून आले. त्यापूर्वी त्यांना नगरसेवक, उपनगराध्यक्ष या पदाचा अनुभव होताच. परभणीत आज दिसणार्‍या अनेक विकासकामांचा प्रारंभ देशमुख यांनी केला. त्यामुळे परभणीचे शिल्पकार अशी त्यांची ओळख झाली होती. 1962 मध्ये परभणी तर 1972 ला जिंतूर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी नजिकचे प्रतिस्पर्धी लिंबाजीराव दूधगावकर यांच्यावर 31 हजार 539 मतांनी पराभव केला. 1980 ला मात्र ते पराभूत झाले. महाराष्ट्र राज्य गृहवित्त मंडळाचे अध्यक्ष, बियाणे महामंडळ संचालक या पदावर त्यांनी काम केले होते.

मुलुखमैदानी तोफ

मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ ही नांदेडचे शेकाप खासदार केशवराव धोंडगे यांची ओळख. अर्थात लोकसभेपेक्षा केशवरावांनी गाजविली ती विधानसभाच (पाच टर्म ते आमदार होते. त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कामावर प्रदीर्घ लेखन होईल.) आणीबाणीत ते 17 महिने कारागृहात होते. 77 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांना 1 लाख 33 हजार मतांनी पराभूत केले. विविध प्रकारच्या आंदोलनांनी पोलिसांना जेरीस आणणार्‍या केशवरावांना मन्याडचा वाघ असे म्हणत. मराठवाडा विकास आंदोलन, संयुक्‍त महाराष्ट्र, शेतकरी कामगारांच्या अनेक प्रश्‍नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. जयक्रांती हा त्यांचा परवलीचा शब्द.

बँकेची कार परत केली

लातुरातून लोकसभेवर निवडून गेलेले भाई उद्धवराव पाटील यांना पहिली लोकसभा, राज्यसभा, विधानसेभचाही अनुभव होता. 1977 ला त्यांना पक्षाने उमेदवारी घोषित केली, त्या काळात ते भूविकास बँकेचे संचालक होते. उमेदवारीची घोषणा होताच त्यांनी बँकेची कार परत केली आणि लातूरकडे बसने निघाले. डिपॉझिटसाठी असणारी रक्‍कम गावागावातून गोळा केली. लातुरातून अपेक्षेप्रमाणे निवडून गेल्यानंतर एस. एम. जोशी यांनी त्यांना केंद्रीय कृषीमंत्री होण्याची गळ घातली. पण उद्धवरावांनी ती नाकारली. मंत्री झालो तर तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल, ही त्यांनी भावना बोलवून दाखविली. एकदा संसद भवनातील कँटीनमध्ये खा. रामराव आवरगावकर यांच्यासोबत ते चहा पित बसले असताना यशवंतराव चव्हाण तेथे आले व त्यांनी उद्धवरावांना मुंबई, पुण्यात स्थायिक झाल्यास महाराष्ट्राला फायदा होईल, असे मत मांडले. पण उद्धवरावांना शेवटपर्यंत धाराशिवचे घर सोडले नाही.

वैचारिक बांधिलकी, कार्यकर्त्यांशी नाळ, सामाजिक दायित्वाची जाणीव शेकापच्या या तिन्ही नेत्यांना होती. मराठवाड्याचा पक्ष व राजकीय वर्तुळात आपला ठसा त्यांनी उमटविला होता. या तिन्ही नेत्यांच्या मृत्यूनंतर शेकापचे अस्तित्व आता मराठवाड्यात नगण्य स्वरूपातच राहिले, हे दुर्देव.

Back to top button