बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दोन लाख लंपास | पुढारी

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दोन लाख लंपास

वैजापूर, पुढारी वृत्त्तसेवा ः कोपरगावला जाणार्‍या बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून 2 लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.11) सायंकाळी शहरातील बसस्थानकात घडली. महिला नातलगाच्या लग्नासाठी हे पैसे घेऊन जाताना भामट्यांनी ते पळविले. या घटनेमुळे पोलिसांची तपासणी होईपर्यंत बसस्थानकातच थांबविण्यात आल्याने अन्य प्रवासी ताटकळले होते. दरम्यान बस-स्थानकातून यापूर्वीही अनेकदा रोकड तसेच सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातील एकाही घटनेचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही.

शहरातील पाटील गल्लीतील परवीन शकील शेख यांच्या कोपरगाव येथील एका नातेवाइकाचे लग्न आहे. लग्नासाठी परवीन शेख यांनी सोमवारी दुपारी शहरातील एका पतसंस्थेतून 2 लाख रुपयांची रोकड काढून आणली होती. रक्कम काढल्यावर त्यांनी घरी जाऊन जेवण केले. परवीन या नातेवाईकाला ही रक्कम देणार होत्या. कोपरगावला जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता दोन लाख रुपयांची रोकड घेऊन बस स्थानकावर आल्या. ही रक्कम त्यांनी आपल्याकडील एका पर्समध्ये ठेवली होती.

काही वेळाने कोपरगावला जाणारी बस (एम.एच. 14 बी.टी.3439 ) फलाटावर येताच बसमध्ये चढत असताना त्यांच्या खांद्यावरील पर्समधून 2 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले.

बसमध्ये बसताच त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चालकाने बस फलाटावर थांबवून याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी स्थानकावर धाव घेत बसमधील प्रवाशांची तपासणी केली मात्र रक्कम मिळून आली नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Back to top button