संतप्त मराठा तरुणांनी बस रिकामी पाठवली परत; कृष्णापूर येथील प्रकार | पुढारी

संतप्त मराठा तरुणांनी बस रिकामी पाठवली परत; कृष्णापूर येथील प्रकार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमास लाभार्थ्यांची वाहतुक करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथे पाठवलेली बस परत न्यावी अशी विनंती करीत सकल मराठा समाजातील तरुणांनी रविवारी सकाळी महामंडळाची बस रिकामी परत पाठवली.

संबंधित बातम्या 

हिंगोलीत प्रशासनाकडून शासन आपल्या दारीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री उपस्थित राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी मागील आठ दिवसांपासून दिवस रात्र एक करून कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी बैठकाही घेण्यात आल्या असून या कार्यक्रमास गर्दी दाखविण्यासाठी लाभार्थ्यांना आणले जात आहे. त्यासाठी महामंडळाच्या ३०० बसेस तसेच खाजगी ४०० वाहने घेण्यात आली आहेत.

याशिवाय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चक्क गाव पातळीवर काम करणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांवर लाभार्थ्यांना आणण्याची सक्ती केली जात आहे. गावातून वाहनात बसलेले छायाचित्र, अर्ध्या रस्त्यात आल्याचे छायाचित्र आणि कार्यक्रमस्थळावर आल्याचे छायाचित्र काढण्याच्या सुचना दिल्या असून कार्यक्रमस्थळावर लाभार्थ्यांना अल्पोपहार वाटप केला जाणार आहे.

दरम्यान, कार्यक्रमास जास्तीत- जास्त गर्दी जमविण्यासाठी लाभार्थ्यांना आणण्याची जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची शक्कल त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सकाळी सव्वा आठ वाजता कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथे महामंडळाची बस गावात नेण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण एकत्र आले. त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यासाठी आंदोलन केले. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाच्या प्रचाराची गाडी येऊ देणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गावातून बस बाहेर उभी करावी अशी चालकाला विनंती केली आणि त्यानंतर बस गावाबाहेर पाठविण्यात आली.

Back to top button