लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करा; अन्यथा एक एप्रिलपासून निधी नाही

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : वैयक्तिक लाभाच्या योजनेतील पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करा. हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. अन्यथा एक एप्रिलपासून संबंधित योजनांसाठी निधी दिला जाणार नाही, असे आदेश राज्य शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचनाही संबंधित विभागाच्या सचिवांना दिली आहे. यामुळे आधार कार्ड न जोडलेल्या लाभार्थ्यांची शोधाशोध सुरू झाली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्याक विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास आदी विविध विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या याकरिता सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. ही सर्व प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचाही निर्णय झाला होता.

काही विभागांच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची कार्यवाही अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे आढळून आले आहे. ही बाब गंभीर असल्याचे सांगत 31 मार्च पर्यंत ही सर्व कार्यवाही पूर्ण करा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. आधार कार्ड संलग्न करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर सोपविण्यात आली आहे. सचिवांना सर्व लाभार्थ्यांचे आधार संलग्न झाल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. जोपर्यंत हे हमीपत्र दिले जात नाही तोपर्यंत 1 एप्रिलपासून संबंधित योजनांना निधी देण्यात येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे. यामुळे आता आधार जोडले न गेलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन ते जोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 27 खासगी आधार संच बंद

एकीकडे आधार कार्ड जोडण्याची शासकीय यंत्रणेची धांदल उडाली असताना जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी परवानगी दिलेले 27 खासगी आधार संच राज्य स्तरावरून बंद करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना आधार कार्ड संबंधित कामांसाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. ही केंद्रे पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news