Vel Amavasya : शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली ‘वेळ अमावस्या’ | पुढारी

Vel Amavasya : शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली 'वेळ अमावस्या'

उमरगा : शंकर बिराजदार : भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी प्रधान संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व असल्याने वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या स्वतः सह जगाला जगविण्याऱ्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि ११) शेतात पांडव आणि काळ्या आईची सहकुटुंब मनोभावे विधिवत पुजा करून आप्त स्वकीय, मित्रांसह वेळ अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात विविध सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पण उमरगा तालुक्यात काही सण-उत्सव असे आहेत की ते फक्त या सीमेलगतच्या तालुक्यातच साजरे केले जातात. मुळ कर्नाटकातील असलेला वेळी अमावस्या म्हणून साजरा होणारा सण दरवर्षी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील शेतकरी साजरा करतात. धाराशिव, लातूर, सोलापूरच्या काही भागात साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. प्राचीन काळापासून मराठी मार्गशिर्ष महिन्यात याचा अपभ्रंश होवून येळवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. उमरगा तालुक्यात गुरुवारी सर्व शेतकऱ्यांनी मित्र परिवारासह सहकुटुंब शेत गाठले. शेतातील झाडांभोवती ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्यापासून तयार केलेल्या खोपीत पाच पांडव मांडून त्यांना गेरु व चुन्याचा रंग दिला. कडब्याच्या पेंढ्यांपासून तयार केलेल्या खोप लालसर रंगाच्या मखमली शालीने बांधली. त्यानंतर डालग्यातून आणलेले सर्व साहित्य खोपी समोर ठेवून पांडवांसमोर हिरव्या कापडावर लक्ष्मीची पूजा मांडली. त्यानंतर भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबट भात, ज्वारी आणि बाजरीचे उंडयाचा नैवेद्य दाखविला. हे वर्ष भरभरुन पिकू दे, इडा, पिडा टळू दे अशी प्रार्थना केली. त्यानंतर वाटीत अंबिल घेवून शेेतातील पिकांत शिंपडत हर बोलो रे राजा, हर बोलो, हर हर महादेव, जटाशंकर, महादेवाच्या नावानं चांगभल असा जयघोष केला. तालुक्यातील गावात वेगवेगळ्या पद्धतीने जयघोष केला जातो.

Vel Amavasya

त्यानंतर मातीच्या नवीन माठात ज्वारीचे पीठ, लसून, मिरची व ताकापासून बनविलेले अंबिल, बाजरीचे उंडे, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, आंबट भात, वेगवेगळ्या फळ व पालेभाज्या एकत्रित करून तयार केलेली चुलीवरची भज्जी, गव्हाची खीर, कोंदीच्या पोळ्या, अशा विविध प्रकारच्या जेवणावर शेतकऱ्यांनी आप्त परिवार मित्रांनी ताव मारला.

Vel Amavasya

शेतकरी सायंकाळी शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्यावर मातीच्या किंवा तांब्याच्या लहान भांड्यात दूध व शेवया उतू जाईपर्यंत शिजवतात. दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असा समज असतो. विशेषतः दुध उत्तर दिशेला उतू गेले तर पिके चांगली येणार असल्याचा तसेच पुढील वर्षीचा अंदाज बांधतात. त्यानंतर ज्वारीच्या कडब्याची पेंढी पेटवून हातात पेटत्या पेंढीसह पिका भोवती शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकांवर ईगीन अर्थात किडींचा प्रादूर्भाव होत नाही, अशी शेतकऱ्याची धारणा आहे. त्यानंतर सर्वजण सूर्यास्ताच्या वेळी आनंदाने घरी परतले. तत्पूर्वी सकाळ पासून सर्व रस्ते वाहने बैलगाडी दुचाकी व पायी चालत जाणाऱ्या महिला पुरुषाच्या गर्दीने फुलून गेले होते. तर काही जण बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांमधून सर्वजण शिवार गाठण्यासाठी धडपड करताना दिसून येत होते.

Vel Amavasya

शहरासह गावात अघोषीत संचारबंदी! शेतशिवार माणसांनी फुलले

वेळ आमावस्येच्या दिवशी पूर्वी बैलगाडीमध्ये सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा बैलगाडीत धडधड आदळत आपटत शेत गाठायचे. सध्या यांत्रिकीकरणामुळे शेतीत बैलाचा वापर कमी झाला असला तरी ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंब बैलगाडीतून, तर व्यापारी, नोकरदार, लहान मुले, कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक मिळेल त्या वाहनाने शेत गाठले. त्यामुळे दिवसभर शिवार माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे शहरासह गावा गावात सर्वत्र अघोषित संचार बंदीचे चित्र होते.

Vel Amavasya

वनभोजनाचा स्वाद

बाजरीच्या पिठाचे उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन चुलीवर बनविलेली भज्जी, वांगे, कांदा, लसूण पात व हिरव्या मिरच्या पासुन तयार केलेले वांग्याचे भरीत,गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, खिचडा या विविध पदार्थासह अंबिलाचा शेत शिवारात वन भोजनाचा शेतकरी कुटुंबानी मित्र परिवारांसह मनसोक्त स्वाद घेतला.

हेही वाचा : 

Back to top button