हिंगोली : चाकूचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या चौघांना अटक | पुढारी

हिंगोली : चाकूचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या चौघांना अटक

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा :  दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत २० हजारांचा ऐवज गुरूवारी (दि.१०) वाटमाऱ्यांनी लुटला होता. ही घटना आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. अवघ्या तीन तासात घटनेचा तपास करीत आखाडा बाळापूर पोलीसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील राजेश पांडुरंग अवचार हे गुरुवारी कामानिमित्त आखाडा बाळापूर येथे आले होते. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास ते मित्रासह दुचाकीवरून भोसीकडे निघाले होते. दाती फाट्याजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांची वाट अडवून त्यांच्यासह मित्राला मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १० हजाराची रोकड व मोबाईल असा २० हजारांचा ऐवज वाटमाऱ्यांनी पळविला. याप्रकरणी राजेश अवचार यांनी आखाडा पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली.

हे वाटमारी नांदेडच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच त्यांनी दुचाकी रोडवर सोडून अर्धापूर तालुक्यातील पार्डी शिवारात पळ काढला. पोलीसांनी कसून शोध घेतला असता अंधारात दबा धरून बसलेले सौरभ माधवराव गायकवाड (रा. आखाडा बाळापूर,) ज्ञानेश्‍वर सदानंद सोळंके (रा. हस्तरा ता. हदगाव), अभय किरण कडगे (रा. बाळापूर,) अनिकेत बालाजी सुर्यवंशी (दत्तनगर, नांदेड) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर त्यांचे इतर दोन साथीदार ओमकार कांबळे व विनायक हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीसांनी या वाटमाऱ्यांकडून चोरलेले व गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाईल व रोख रक्‍कम, तीन मोटारसायकल असा २ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर नागरे, रोहिदास राठोड, जमादार नागोराव बाभळे, शिवाजी पवार, प्रभाकर भोंग, मुलगीर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार करीत आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button