बीड : केज पोलिसांनी पकडली पुण्याची कोयता गँग | पुढारी

बीड : केज पोलिसांनी पकडली पुण्याची कोयता गँग

केज (बीड) : पुढारी वृत्तसेवा – धारदार शस्त्राचा धाक दाखवून पुणे शहर आणि परिसरात दहशत माजविणारी कोयता गँग केज पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या धाडसी करवाई बद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतची माहिती अशी की, दि. १२ जुलै रोजी केज-बीड रोडवरील जोला सासुरा पाटीवरील राणा डोईफोडे यांच्या रेणू पेट्रोल पंपावर ॲड. प्रदीप ईतापे हे त्यांच्या मोटारसायकलीमध्ये पेट्रोल भरीत असताना तेथे एका मोटारसायकलवर तीन अनोळखी तरुण आले. त्यांनी ॲड. प्रदीप ईतापे यांना लातूरला जाण्याचा रस्ता विचारला आणि त्यानंतर त्यांची बाचाबाची झाली. ईतापे यांच्यासोबत त्यांचे मित्र काळे हे होते व त्यांना मारहाण करून कोयतेही उगारले.

केज पोलिस
केज पोलिस

ॲड. प्रदीप ईतापे यांनी ही माहिती केज पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व त्यांचे सोबत पोलीस नाईक शमीम पाशा आणि वाहतूक शाखेचे नितीन जाधव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी त्यांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतले असता त्यांच्याकडून एक धारदार कोयते आणि स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ताब्यात घेतली. त्यांची अधिक चौकशी केली असता ते तिघे यशवंत कुमार उत्तम लोधी (रा. सोमेश्वरवाडी सावरकर पार्क पाषाण पुणे), गणेश एकनाथ मनाळे (रा. जवान शेख भट्टी, कुमार शांती निकेतनच्या बाजूला बालाजी चौक पाषाण, पुणे) आणि विशाल राजाभाऊ कांबळे (रा. एकनाथ नगर, पाषाण पुणे) हे असल्याचे निष्पन्न झाले.

‘ती कोयता गॅंग’ असल्याचे पुणे पोलिसांनी केले स्पष्ट 

पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पुणे एलसीबीशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ही कोयता गँग असून त्यांनी पुणे शहर आणि परिसरात धारदार शस्त्र आणि कोयत्याची धाक दाखवून अनेक गुन्हे केले आहेत.

याप्रकरणी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांच्या विरुद्ध दि. १३ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

केज पोलिसांच्या धाडसाचे कौतुक

गुन्हेगारकडे धारदार शस्त्र असतानाही पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस नाईक शमीम पाशा आणि पोलीस नाईक नितीन जाधव यांनी अलौकिक धाडस दाखवून त्यांना जेरबंद केले. या त्यांच्या धाडसा बद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

सहाय्यक फौजदार ढाकणे नसते तर…

घटनास्थळी तिघे अनोळखी आणि ॲड. प्रदीप ईतापे व त्यांचे मित्र एकनाथ काळे यांच्याशी झटापट सुरू असताना जर त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद ढाकणे नसते; तर त्या तिघांनी इतापे आणि काळे यांच्यावर वार करून पळून गेले असते. मात्र तो अनर्थ सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद ढाकणे यांच्यामुळे टळला.

Back to top button