Beed News: नेकनूर येथील जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेत कोट्यवधीच्या ठेवी अडकल्या; ठेवीदारांची पोलिसांत तक्रार | पुढारी

Beed News: नेकनूर येथील जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेत कोट्यवधीच्या ठेवी अडकल्या; ठेवीदारांची पोलिसांत तक्रार

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा: तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेच्या अध्यक्षांनी नेकनूरमध्ये लोकांना काही दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोठा कालावधी लोटूनही पैसे मिळत नसल्याने अखेर ठेवीदारांनी आज (दि.१०) सकाळी ११ वाजता नेकनूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल (Beed News)  केली. नेकनूर शाखेत आठ ते दहा कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी सांगितले.

नेकनूरमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. या ठिकाणी अशिक्षित माणसांना व्यवहार करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी सुलभ व्यवहार करण्यासाठी पतसंस्थेचा मार्ग निवडला. पंधरा वर्षात सामान्य लोकांमध्ये अनिता बबन शिंदे यांच्या जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेने घर केले. नात्यागोत्यांमुळे पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवीदार ठेवी ठेवू लागले. यामध्ये प्रामुख्याने कष्टकरी, शेतकरी वर्गाचा मोठा समावेश आहे. पै पै जमा करून अनेकांनी विवाह, दवाखाना, शेती कामे या कारणासाठी पैसे ठेवलेले होते. दरम्यान, तीन महिन्यांत पतसंस्था डबघाईला आल्याचे कारण देत ठेवी देण्यास असमर्थता दाखवण्यास सुरुवात (Beed News) केली.

या दरम्यान गोल्ड लोनचे पैसे घेत काही खातेदारांना १५, २० हजार देत उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन शिंदे दापत्याने दिले. त्यामुळे ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दिलेल्या अनेक तारखा उलटून गेल्याने नेकनूर शाखेतील ठेवीदारांनी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. यावर विलास हजारे यांनी ठेवीदारांची गाऱ्हाणी ऐकून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा 

बीड: श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी गेवराईत मुक्कामी

बीड : राजकारण आणि नातेही; मुंडे बहीण भावाचा संदेश

बीड : आष्टी तालुक्यात बिबट्याचे पिल्लू पडले विहीरीत

Back to top button