बीड : राजकारण आणि नातेही; मुंडे बहीण भावाचा संदेश | पुढारी

बीड : राजकारण आणि नातेही; मुंडे बहीण भावाचा संदेश

बीड : बालाजी तोंडे राजकारणात नीती, मूल्य, तत्त्व आणि विचार राहिलेला नाही, हे आपण सारेच पाहत आहोत. या परिस्थितीत आपण किमान नाते तरी जपले पाहिजेत, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला भाऊ धनंजय मुंडे यांचे कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल स्वागत आणि सत्कार तर केलाच परंतु औक्षन करून नातेच महत्त्वाचे असल्याचा संदेशही दिला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची ही भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणातील नीतिमत्तेचा आदर्श आहे.

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे हे आगळे वेगळे नेते होते. बालाघाटाच्या कुशीत जन्म घेऊन हिमालयाच्या उंचीला थिटे करणारा हा नेता किती मोठा होता, हे ते गेल्यानंतर कळले. अपघाताच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा शहरातील शेकडो- हजारो मुलं पुढे आले आणि म्हणाले, लोकनेते मुंडे साहेब आमच्या शिक्षणाचा खर्च करत होते. ते आम्हाला शिकवत होते, त्यांच्यामुळे आम्ही शिकत होतो. कोणी म्हणाले मला घर नव्हते साहेबांमुळे माझे घर झाले. कोणाचा दवाखाना केला. शेकडो कॅन्सर ग्रस्तांना मदत केली. सर्व समाजातील ऊसतोड मजूर, अल्पभूधारक शेतकरी, कामगार अशा वंचित- उपेक्षित घटकातील हजारो मुलींच्या विवाहासाठी स्वर्गीय मुंडे यांनी मदत केली.

आमदार- खासदार तर शेकडो बनवले. परंतु कायम तळागाळातील माणसाच्या पाठीवर हात ठेवून स्वाभिमान देत त्याची मान ताठ केली. साखर कारखानदार बनल्यानंतरही कारखानदाराची भूमिका न घेता “मी ऊसतोड मजुरांचा नेता आहे” म्हणत. ऊसतोड मजुरांचा ते पाठीराखा बनले. राज्यात नव्हे तर राष्ट्रीय नेता बनल्यानंतर देखील त्यांनी तळागाळातील घटकाचेच नेतृत्व केले.

अशा या नेत्याच्या घरात त्यावेळी झालेली फुट महाराष्ट्रातील एकाही माणसाला आवडली नव्हती. परंतु “काळाच्या कणखर टाचा तुडीत असतात. संस्कृतिचे मस्तक” या विचाराप्रमाणे काळ कोणालाच माफ करत नाही. आज जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, तोच उद्या त्या खड्ड्यात पडतो. हा निसर्गाचा नियम आहे. सध्याचे राजकारण आणि राजकारणातील उलथापालथी निसर्ग नियमाप्रमाणेच आहेत. कारण ज्यांनी काल पेरले तेच आज उगवत आहे. या साऱ्या परिस्थितीत हेवे, दावे, मतभेद आणि मनभेद सारे काही विसरून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आपला भाऊ धनंजय मुंडे हे भाजपाचा मित्रपक्ष बनलेल्या पक्षाकडून कॅबिनेट मंत्री बनले. खरे तर अशावेळी इतर कोणत्याही नेत्या आणि नेतृत्वाने प्रचंड त्रागा केला असता. परंतु नीतिमत्तेचा राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या, भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी द्वेष न करता लाडक्या भावाचे स्वागत, सत्कार तर केलाच परंतु औक्षवणही केले.

मागील काळात राज्याच्या राजकारणात ज्या काही घटना घडल्या. त्या सामान्य माणसाला अजिबात रुचलेल्या नाहीत. या परिस्थितीत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे केलेले औक्षवन सामान्य माणसाला सुखावणारे आणि नाते किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून देणारे आहे. चिखलातच कमळ फुलते, हे या प्रसंगातून दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार चिखल झाला असताना मुंडे बहीण- भावाने चिखलात फुलवलेले कमळ आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे…!

हेही वाचा : 

Back to top button