Buldhana Accident : ‘समृद्धी’ अपघातातील २४ मृतदेहांवर बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार | पुढारी

Buldhana Accident : 'समृद्धी' अपघातातील २४ मृतदेहांवर बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या बस अपघातात जळून मृत्यू झालेल्या २५ जणांपैकी २४ जणांच्या मृतदेहांवर आज (दि.२) बुलढाणा येथील स्मशानभुमीत मृतांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नागपूर-मुंबई अतिजलद समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवारची रात्र जणू काळ बनून आली. नागपूरहून पुण्याकडे जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची बस सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गाच्या दुभाजकावर भरधाव वेगाने आदळली. बसने तत्काळ पेट घेतल्याने या अग्नितांडवात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सर्व २५ मृतदेहांची नावे समोर आली असली तरी त्यांची ओळख पटू शकलेली नाही. डी.एन.ए. चाचणीचा निष्कर्ष यायला बराच अवधी लागणार आहे. जळालेले मृतदेह जास्त काळ ठेवणे शक्य नसल्याने या मृतदेहांवर बुलढाणा येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेतला आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी बुलढाणा येथे याबाबत मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. २५ मृतदेहांपैकी एका मृतदेहाचा चेहरा व शरिराची ठेवन पाहून हा मृतदेह नागपूर येथील झोया नावाच्या मुस्लिम महिलेचा असल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे व नागपूर येथे दफन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र डी.एन.ए. चाचणीच्या निष्कर्षात हा झोयाचा मृतदेह असल्याचे सिद्ध झाले तरच तो मृतदेह नातेवाईकांना सोपवला जाईल. अन्यथा प्रशासनाकडून त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज बुलढाणा येथेच २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याने मृतांचे कुटूंबिय, नातेवाईक बुलढाणा येथे मोठ्या संख्येने आले आहेत.

Back to top button