मराठवाड्यात तिघांचा मृत्यू, 31 जनावरांचा अंत | पुढारी

मराठवाड्यात तिघांचा मृत्यू, 31 जनावरांचा अंत

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा :  मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचे सत्र एप्रिल महिन्यातही सुरू असून शुक्रवारी (दि. 7) संपूर्ण मराठवाड्याला कमी-अधिक प्रमाणात सोसाट्याचा वारा, अवकाळी पावसाचा फटका बसला. नुकसानीच्या मोजमापास सुरुवात झाली असून एका दिवसात तिघांचा मृत्यू तर 31 जनावरे दगावली असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे, या पावसात शेती पिकांचे नुकसान झाले असले तरी 33 टक्क्यांच्या नियमामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

मराठवाड्यात कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत सातत्याने भर पडते. महिनाभरापूर्वीच गारपिटीमुळे पिकांची मोठी नासाडी झाली असतानाच आता शुक्रवारी पुन्हा अवकाळी पावसाने अनेक गावांमधील पिकांची धूळधाण उडाली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 7 एप्रिल ते 8 एप्रिलच्या कालावधीत आठही जिल्ह्यांत सरासरी 4.1 मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक 8.9 मि.मी. पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला असून जालना, नांदेड व लातूर जिल्ह्यांतही अवकाळीचा जोर होता. परभणी, हिंगोली, बीड व धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा जोर तुलनेत कमी होता. आकडेवारीत पाऊस लहान दिसत असला तरी सोसाट्याचा वारा, गारपीट व वीज पडल्याच्या घटनांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला; तर 4 जण विविध घटनेत जखमी झाले आहेत.

शेतकर्‍यांसाठी पशुधनाचे मोठे महत्त्व असते. या अवकाळीमुळे एका दिवसात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून यामध्ये 4 लहान तर 27 मोठी असे एकूण 31 जनावरेही मृत झाल्याची नोंद प्रशासनाच्या प्राथमिक अहवालामध्ये आहे. सर्वाधिक 13 जनावरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मृत झाली, तर बीड जिल्ह्यात 5, धाराशिव व जालना जिल्ह्यात प्रत्येकी 4, नांदेड जिल्ह्यात तीन, हिंगोली दोन तर परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जनावराचा समावेश आहे.

Back to top button