सावधान, मुले नशा ‌तर करत नाही ना?; ‌एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे सेवन | पुढारी

सावधान, मुले नशा ‌तर करत नाही ना?; ‌एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे सेवन

गेवराई: गजानन चौकटे : सध्या सूर्य आग ओकत आहे. शहरी व ग्रामीण भागात उन्हातून बाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे. दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवू लागला आहे. उष्म्यापासून शरीराला थंडावा मिळावा, यासाठी नागरिकांची पावले आपुसकच थंडपेयाकडे वळतात. बाजारपेठेतही विविध थंडपेयांचे स्टॉल लागले आहेत. तर ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेयांची विक्री होऊ लागली आहे. याला शालेय मुले आणि तरुण बळी पडू लागली आहेत.

पान टपरीवर १० रुपयांत ही कॅफेन एनर्जी मिळत असून यातून सौम्य प्रकारची नशा होत आहे. यास लहान मुले, तरूण, महिला आहारी जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. किराणा दुकान, हॉटेलमध्ये एनर्जीच्या बाटल्या सहज मिळत आहे. कमी पैशांत मिळत असल्याने लहान मुले याच्या आहारी जात आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रात्री झोप येऊ नये, म्हणून याचा वापर केला जात आहे. वाहनचालक ही मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत. लहान मुले पार्टीच्या नावाखाली याचे सेवन करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यास झोप येत नाही. शरीरात स्फूर्ती निर्माण होते. हे पिल्यानंतर गुंगी येते.‌ याचबरोबर तोंडाचा देखील वास येत नाही आणि झिंगही चार तास राहते. त्यामुळे सध्या याचा धोका माहित नसलेले याच्या आहारी मात्र गेलेले दिसत आहेत. 250 ml च्या बाटलीत 75 मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे. तर लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याच्या स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. या बाटलीवर प्रत्येकी 100 मिलीला 29 मिलीग्राम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र, या बाटल्या थेट अडीचशे मिलीच्या आहेत. तर दिवसभरात पाचशे मिली पेक्षा जास्त घेऊ नये, असे स्पष्ट केलेले आहे. अशी जीवघेणी नशा नकळत मुले आणि तरूणांकडून होत असल्याने पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

कोणत्याही परिस्थितीत कॅफेन धोकादायक आहे. कॅफेन १०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेली तर नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारजू निकामी होतो. गरोदर माता स्तनपान करणाऱ्या मातांनी घेऊ नये. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले, तरी त्याचे व्यसनच लागते.

– डॉ. संजय कदम , तालुका वैद्यकीय अधिकारी

तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये

दिवसेंदिवस तरूणाईमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरूणाईने वयाचे भान ठेवून नशा करू नये. कॅफेनचे सेवन करून आरोग्याशी खेळू नये. याचे सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे.

– बबलू खराडे, शिवसेना, जिल्हा उपाध्यक्ष, गेवराई

हेही वाचा 

Back to top button