बीड: नशेच्या औषधांचा साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

बीड: नशेच्या औषधांचा साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

बीड, पुढारी वृत्तसेवा : नशेच्या गोळ्या, खोकल्याचे औषध घेवून नशा करणार्‍या किशोरवयीन, तरुणांची संख्या बीड शहरात वाढत होती. यावर नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी विशेष पथकाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि.२९) बीड शहरात दोन ठिकाणी कारवाई करत औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरात गोळ्यांची तसेच खोकल्याच्या औषधातून नशा करणार्‍यांची संख्या वाढत होती. यातून काही दिवसांपूर्वी एकाचा खून तसेच अत्याचाराची घटना घडल्याचेही समोर आले होते. त्यानुसार विशेष पथकाचे सपोनि विलास हजारे यांनी मंगळवारी (दि. २८) रात्री पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कंकालेश्वर मंदिर परिसरात छापा टाकला. आरोपी शेख फैजान शेख मकसूद उर्फ सोनू (रा. शहंशाहअली दर्गा पेठ, बीड) याला जागीच पकडून त्याच्याकडून codein phosphate chlorpheniramine maleate syrup या औषधाच्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३५३ रुपये किमतीच्या ११ बाटल्या जप्त केल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डिसले, विनायक कडू यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button